Ketan Agarwal Murder : लोहगड किल्ल्यावर ‘मर्डर प्लॅनिंग’ची थरारक इनसाईड स्टोरी; ‘साप आला’ असं म्हणत सियाने केला होता पहिला प्रयत्न!

spot_img

पुण्यातून दिशाभूल करण्याचा चेतनचा ‘मोबाईल प्लॅन’ फसला; दुकानाचा कर्मचारी बनणार महत्त्वाचा साक्षीदार

लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्येप्रकरणी पोलीस तपासात दररोज नवनवे आणि अंगावर काटा आणणारे खुलासे समोर येत आहेत. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला संपवण्यासाठी एकापाठोपाठ एक अनेक भयानक प्लॅन आखले होते, अशी माहिती आता उघड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच, म्हणजेच मे महिन्यात केतनचा काटा काढण्याची पूर्ण तयारी झाली होती. यासाठी या दोघांनी लोहगड किल्ल्याची रीतसर रेकी (Recke) केली होती. जर लोहगडचा प्लॅन चुकला असता, तर तिसऱ्या प्लॅननुसार महाबळेश्वरमध्ये केतनची हत्या करण्याची त्यांची पूर्ण तयारी होती, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात होणारे लग्न मोडण्यासाठी सिया आणि चेतन अत्यंत उतावीळ झाले होते. ३१ मे रोजी जेव्हा सिया आणि केतन लोहगड किल्ल्यावर गेले होते, तेव्हा केतन एका अत्यंत धोकादायक कड्याच्या टोकावर बसला होता. नेमकी याच वेळी सियाच्या मनात केतनला खाली ढकलून देण्याचा विचार आला होता. यापूर्वीही तिने केतनला कड्यावरून ढकलण्याचा कथित प्रयत्न केला होता; मात्र केतन थोडक्यात वाचला. त्यावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी सियाने ‘तिथे साप आला होता’ अशी खोटी कहाणी रचून केतनची दिशाभूल केली होती.

या संपूर्ण कटात तांत्रिक पुराव्यांनी पोलिसांना मोठी मदत केली आहे. १८ जून रोजीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात चेतन चौधरीच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्या आहेत. चेतनने अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत गडावर जाऊन परत खाली येण्याची घाई केली. गडावर चढायला २५ मिनिटे आणि उतरायला १५ मिनिटे लागतात, याचा अर्थ चेतनने एका सुनसान ठिकाणी केतन आणि सियाची तब्बल ८ मिनिटे वाट पाहिली होती. यादरम्यान सिया वारंवार मागे वळून पाहत चेतनला इशाऱ्यांद्वारे लोकेशन समजावून सांगत होती, हेही सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट झाले आहे.

स्वतःचे लोकेशन पुण्यात दाखवून पोलिसांचे लक्ष विचलित करण्यासाठी चेतनने एक मास्टरप्लॅन आखला होता. त्याने त्याच्या दुकानातील कर्मचारी नीरज कुमार याच्याशी मोबाईलची अदलाबदल केली होती. नीरज दिवसभर पुण्यात राहून चेतनचे फोन उचलत होता, तर चेतन नीरजचा फोन घेऊन लोहगडावर गेला होता. मात्र, पोलिसांच्या सायबर सेलने तांत्रिक तपास करत नीरजच्या मोबाईलचे लोकेशन थेट लोहगड ट्रॅक केले आणि चेतनचा हा बनाव उघडा पाडला. आता या प्रकरणात चेतनचा कर्मचारी नीरज कुमार हा पोलिसांचा मुख्य साक्षीदार (Witness) होणार असून, या भक्कम पुराव्यांमुळे आरोपींच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ