Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; न्यायालयाने आरोपीस ठोठावली तीन वर्ष कारावासाची शिक्षा 

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:दि.२६ जून [ रमेश तांबे ]

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालय जुन्नर यांनी ठोठावली तीन वर्ष कारावास व एक हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रमेश सखाराम दाभाडे वय ४० वर्ष असे कारावासाची शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत दि.११ जानेवारी २०२० रोजी सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी त्यांच्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ कपडे धुण्यासाठी गेली होती. पिडीत मुलगी कपडे धुत असताना, आरोपी रमेश दाभाडे याने पिडीत मुलीस पाठीमागुन मिठी मारून, तीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून,पिडीत मुलीचा विनयभंग केला होता. सदरचा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलगी घाबरली व तीने तीचे आजोबा यांना आवाज देवून बोलावुन घेतले. पिडीत मुलीचे आजोबा आल्यानंतर तीने त्यांना सर्व घडला प्रकार सांगीतला. त्यानंतर पिडीतचे आजोबा यांनी आरोपी दाभाडे यास घडल्या प्रकाराबाबत जाब विचारला असता त्याने पिडीत मुलीस व तीच्या आजोबास शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली होती.

सदरच्या घडल्या प्रकाराबाबत पिडीत मुलीने दिनांक ११ जानेवारी २०२० रोजी ओतूर पोलीस स्टेशनला तकार दिल्याने आरोपी रमेश दाभाडे याचे विरूध्द विविध कलमानसह लैंगीक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधि.२०१२ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी करून आरोपीस अटक केली होती. यातील आरोपीचे विरोधात सबळ पुरावे प्राप्त करून तपासी अधिकारी यांनी परिपुर्ण दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले होते. गुन्ह्याचे दोषारोपत्र दाखल केल्यानंतर सदरच्या गुन्ह्याची सुनावणी विशेष न्यायाधिश एस.बी.शेलार, अतीरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, जुन्नर यांच्यासमोर झाली असून आरोपीचे विरोधात सबळ पुरावे आढळुन आल्याने मा.न्यायालयाने आरोपी रमेश दाभाडे यास दि. २५ जून २०२६ रोजी पोक्सो कायद्याच्या कलम ८ आणि भा.द.वि.का.क. ३५४ (अ) अंतर्गत दोषी धरून ३ वर्ष साधा कारावास आणि १००० रूपये दंड त्याचप्रमाणे दंड न भरल्यास ६ महीने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल,अप्पर पोलीस अधिक्षक शुभम कुमार,उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, अतीरिक्त सरकारी वकील जी.के.खोडे,कोर्ट पैरवी अधिकारी महिला पोलीस हवालदार मनिषा ताम्हाणे, महीला कर्मचारी पुजा औटी यांनी काम केले असुन सदरच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे तसेच पोलीस हवालदार देविदास खेडकर यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ