होणाऱ्या पत्नीनेच रचला केतनच्या हत्येचा कट; सिया गोयलसह ८ जणांवर गुन्हा दाखल, अपघाताचा बनाव उघड
राजस्थानमधील उदयपूर येथील एका आलिशान महालात होणाऱ्या ज्या शाही लग्नाची देशभरात चर्चा होती, त्या १४ कोटींच्या विवाह सोहळ्याचा अत्यंत धक्कादायक आणि क्रूर अंत झाला आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचे सुपुत्र केतन अग्रवाल यांचा लोहगड किल्ल्यावरील दरीत कोसळून झालेला मृत्यू हा अपघात नसून, त्यांची नियोजित पत्नी सिया गोयल हिने रचलेला एक थंड डोक्याने केलेला खून असल्याचा खळबळजनक खुलासा पोलिसांनी केला आहे. या संपूर्ण हत्याकांडात होणाऱ्या पत्नीसह तब्बल ८ जणांचा सहभाग असल्याचे उघड झाले असून, लोणावळा पोलिसांनी या सर्वांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
केतन आणि सिया (पुण्यातील प्रसिद्ध व्यापाऱ्याची मुलगी) यांचे लग्न नोव्हेंबरमध्ये ठरले होते. नातेवाईकांना नेण्यासाठी दोन खासगी विमाने बुक करण्यात आली होती आणि दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, सियाला हे लग्न मान्य नव्हते. तिने केतनला दूर करण्याचा कट रचला आणि स्वतःच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्याला लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगच्या बहाण्याने नेले. तिथे ठरलेल्या कटानुसार, आजूबाजूला कोणी नसताना सियाने आपल्या मित्रांच्या मदतीने केतनला थेट खोल दरीत ढकलून दिले. या कृत्यानंतर केतनचा पाय घसरून अपघात झाल्याचा बनाव तिने रचला होता.
सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती, मात्र तपासादरम्यान पोलिसांना संशय आला. तांत्रिक पुरावे आणि घटनास्थळावरील संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवले असता हा धक्कादायक कट समोर आला. पोटच्या गोळ्याचा अपघात नाही तर घातपात झाला आहे, हे समजताच अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात येत्या काळात आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची आणि धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.




