गरीब कुटुंबांकडून मुले विकत घेऊन लाखो रुपयांना विकणारे १२ दलाल अटकेत; ५ चिमुकल्यांची सुखरूप सुटका
राजधानी दिल्लीमध्ये नवजात बालकांची तस्करी करणाऱ्या एका अत्यंत संशयास्पद आणि मोठ्या आंतरराज्य टोळीचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीचे जाळे दिल्लीपासून राजस्थान आणि गुजरातपर्यंत पसरले होते. पोलिसांनी या प्रकरणी धडक कारवाई करत एकूण १२ आरोपींना बेड्या ठोकल्या असून, ५ नवजात बालकांची त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली आहे. ही टोळी आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लहान मुले विकत घ्यायची आणि ज्या जोडप्यांना अपत्य होत नाही, अशा गरजूंना ती लाखो रुपयांना विकायची, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
पोलीस उपायुक्त (DCP) रोहित राजवीर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सजग नागरिकाने दिलेल्या महत्त्वाच्या टीपनंतर हे संपूर्ण रॅकेट उघडकीस आले. पहाडगंज भागात एक महिला नेहमी वेगवेगळ्या लहान मुलांना घेऊन संशयास्पद रितीने वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून या महिलेवर पाळत ठेवली. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांनी स्वतः ‘बनावट ग्राहक’ बनून या महिलेशी संपर्क साधला. तेव्हा तिने एका नवजात बाळाचा सौदा अवघ्या २० हजार रुपयांच्या टोकन रकमेवर पक्का केला. ती महिला जेव्हा अवघ्या ५ दिवसांच्या चिमुकल्याला घेऊन सौदा पूर्ण करण्यासाठी आली, तेव्हा दबा धरून बसलेल्या पोलिसांनी तिला रंगेहात पकडले.
पोलिसांनी अटक केलेल्या ज्योती, शालू आणि तिच्या सहकाऱ्यांची कसून चौकशी केली असता या काळ्या बाजाराचे विदारक वास्तव समोर आले. या टोळीत प्रत्येकाला वेगवेगळी कामे नेमून दिली होती. यामध्ये दिव्या आणि प्रतिभा नावाच्या महिला मुलांचा पुरवठा करायच्या, तर गुजरातधून अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी ‘कालिया’ हा गरीब कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना जाळ्यात ओढायचा. ही टोळी गरीब पालकांकडून मुलींना १ लाख रुपयांत खरेदी करून पुढे ३ ते ४ लाखांना विकायची. तर मुलांची खरेदी २ लाखांत करून त्यांची विक्री ५ ते ८ लाख रुपयांपर्यंत केली जायची. काही वेळा जास्त नफा कमावण्यासाठी जुळी मुले नसतानाही खोटे सांगून ग्राहकांची फसवणूक केली जायची. या रॅकेटचा तपास अजूनही सुरू असून आगामी काळात आणखी काही बडे चेहरे पोलिसांच्या जाळ्यात येण्याची शक्यता आहे.




