युद्धविरामानंतरही अमेरिका-इराणमध्ये तणाव कायम; एका पैशाचीही आर्थिक मदत न देण्याची ट्रम्प यांची घोषणा
इराण आणि अमेरिका यांच्यात नुकताच युद्धविराम शांतता करार झाला असला, तरी दोन्ही देशांमधील राजकीय वाद आणि तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा एकदा अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली असून या युद्धात इराणची लष्करी ताकद पूर्णपणे संपुष्टात आल्याचा दावा केला आहे. अमेरिकेकडून इराणला मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली जाईल, अशा चर्चा आंतरराष्ट्रीय वर्तुळात रंगत असतानाच ट्रम्प यांनी थेट ‘हात वर’ करत इराणला एक पैशाचीही मदत करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इराणने युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई अमेरिकेकडे मागितली होती, ज्याला ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.
या संपूर्ण वादाला इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या एका विधानामुळे तोंड फुटले. खामेनेई यांनी थेट दावा केला होता की, “मी सुरुवातीपासूनच या कराराच्या विरोधात होतो, परंतु राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या आग्रहामुळे मी मंजुरी दिली.” तसेच, “अमेरिकेलाच युद्ध थांबवण्याची घाई झाली होती आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्वेगातून सर्व मार्ग वापरून हा करार घडवून आणला,” असा टोलाही त्यांनी लगावला होता. खामेनेई यांच्या या विधानावर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड भडकले असून त्यांनी इराणच्या दाव्यांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, “युद्ध थांबवण्याची घाई आम्हाला कधीच नव्हती, तर ती इराणलाच होती. करार करण्यासाठी इराणच आमच्याशी चर्चा करण्यास उत्सुक होता. सध्या इराणकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही; त्यांची रडार यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून सैन्य ताकदही संपली आहे. आता केवळ थोडीफार वायू सेना वगळता त्यांच्या हातात काहीच उरलेले नाही.” दरम्यान, या युद्धादरम्यान इराणने होर्मुजची खाडी बंद केल्यामुळे जागतिक बाजाराचे मोठे नुकसान झाले होते आणि ट्रम्प यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठा दबाव होता, हे जगजाहीर आहे. मात्र, आता युद्ध थांबले असले तरी ट्रम्प आणि खामेनेई यांच्यातील या थेट वाक्युद्धामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष आगामी काळात आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




