PM Modi Slovakia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक स्लोवाकिया दौरा यशस्वी; युरोपीय देशासोबत झाले ११ मोठे करार, ३ महत्त्वपूर्ण घोषणा!

spot_img

स्लोवाकियाला भेट देणारे मोदी ठरले देशाचे पहिलेच पंतप्रधान; संरक्षण, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीमुळे दोन्ही देशांतील संबंध नव्या उंचीवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ आणि १५ जून रोजी युरोपमधील स्लोवाकिया या छोट्याशा देशाला दिलेली दोन दिवसांची भेट ऐतिहासिक ठरली आहे. विशेष म्हणजे, स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जाणारे नरेंद्र मोदी हे स्वतंत्र भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. एका छोट्या देशाचा हा दौरा भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरला असून, या माध्यमातून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय आणि व्यापारी संबंधांना एक नवी चालना मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण दौऱ्यादरम्यान भारत आणि स्लोवाकियामध्ये एकूण ११ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून, ३ मोठ्या घोषणा देखील करण्यात आल्या आहेत. या दोन्ही देशांनी आपले संबंध आता थेट ‘सर्वसमावेशक भागीदारी’ (Comprehensive Partnership) च्या स्तरापर्यंत वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी केलेल्या उत्साही स्वागताबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. फिको हे भारताचे अत्यंत जवळचे आणि खंबीर मित्र असल्याचे सांगत मोदी म्हणाले, “फिको हे एक अनुभवी नेते असून त्यांच्या मैत्री आणि कटिबद्धतेमुळे भारत-स्लोवाकिया संबंधांना एक नवी उंची मिळाली आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होता आल्याबद्दल मला अतीव आनंद होत आहे.” या दौऱ्यात झालेल्या मुख्य करारांमध्ये दोन्ही देशांतील कामगारांसाठी ‘श्रमिक लेबर मायग्रेशन करार’, संरक्षण क्षेत्रातील सहकार्यासाठी ‘लेटर ऑफ इंटेंट’ (LoI) आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीचा समावेश आहे. याशिवाय आयआयटी दिल्ली आणि स्लोवाक टेक्निकल युनिव्हर्सिटी दरम्यान विद्यार्थी विनिमय व संयुक्त संशोधनासाठी सामंजस्य करार करण्यात आला, तसेच पुण्याच्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (NIN) आणि स्लोवाकिया हेल्थ स्पा दरम्यान आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचा करार पार पडला.

या दौऱ्याचे फलित म्हणून तीन मोठ्या घोषणा करण्यात आल्या, ज्या आगामी काळात अत्यंत कळीच्या ठरणार आहेत. पहिली घोषणा म्हणजे दोन्ही देशांमधील संबंधांचा दर्जा वाढवून तो सर्वसमावेशक भागीदारीच्या पातळीवर नेणे. दुसरी अत्यंत महत्त्वाची घोषणा म्हणजे, जागतिक दहशतवादाचा एकत्रितपणे मुकाबला करण्यासाठी दोन्ही देश मिळून एक ‘संयुक्त कार्य समूह’ (Joint Working Group) स्थापन करणार आहेत. तर तिसरी घोषणा नागरिक सेवा आणि सुलभ व्हिसा प्रक्रियेसाठी ‘कॉन्सुलर डायलॉग’ (Consular Dialogue) सुरू करण्याबाबत झाली आहे. वैज्ञानिक संशोधन, पर्यटन, उच्च शिक्षण आणि अगदी चित्रपट-टीव्ही क्षेत्रातील आदानप्रदानासह झालेल्या या बहुआयामी करारांमुळे पंतप्रधान मोदींचा हा स्लोवाकिया दौरा जागतिक पातळीवर भारताचे राजनैतिक वजन वाढवणारा ठरला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ