राज्यातील कडक शिस्त, पारदर्शक कारभार आणि धाडसी निर्णयांसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यभरात तपासणी आणि कारवाईचे सत्र अधिक वेगाने सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या कार्यशैलीची छाप एवढी प्रभावी ठरली आहे की, तपासणीसाठी ते एखाद्या भागात येणार असल्याची केवळ चर्चा जरी पसरली तरी व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये खळबळ उडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
याचाच प्रत्यय बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे आला. परिसरातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी सोशल मीडियावर ‘एफडीएचे साहेब तपासणीसाठी येत आहेत’ असा संदेश व्हायरल झाला. हा संदेश पसरताच काही मिनिटांतच संपूर्ण बाजारपेठेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अनेक व्यापाऱ्यांनी कोणतीही खातरजमा न करता आपापली दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. किराणा दुकाने, मिठाई विक्रेते, पानटपऱ्या, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांनी तातडीने शटर खाली ओढल्याने बाजारपेठ अक्षरशः ओस पडल्याचे चित्र दिसून आले.
विशेष म्हणजे प्रत्यक्षात कोणतीही अधिकृत तपासणी किंवा कारवाई सुरू नसतानाही अफवेच्या आधारावर व्यापाऱ्यांनी घेतलेली ही भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. यावरून तुकाराम मुंढे यांच्या कारभाराबाबत व्यापारी वर्गात किती सतर्कता आणि धास्ती निर्माण झाली आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
अन्नसुरक्षा, दर्जेदार खाद्यपदार्थ आणि नियमांचे पालन याबाबत प्रशासन अधिक कठोर भूमिका घेत असल्याने व्यापाऱ्यांनीही नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, डोणगावमधील हा प्रकार राज्यभर चर्चेचा विषय ठरला असून सोशल मीडियावरील एका संदेशामुळे संपूर्ण बाजारपेठ ठप्प होण्याची घटना अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरली आहे.




