उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील शाळांचे दरवाजे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी खुले झाले असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली आहे. १५ जूनपासून सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यभर ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले असून अनेक ठिकाणी फुलांची उधळण, ढोल-ताशांचा गजर, मिठाई वाटप आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या विशेष उपक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सहभाग घेत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील वहाळ येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीबाबत शुभेच्छा दिल्या. लहान मुलांबरोबर काही वेळ घालवत त्यांनी नव्या शैक्षणिक वर्षासाठी प्रेरणादायी संदेशही दिला.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्हे येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहिल्या. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला. दुसरीकडे, ठाण्यातील महापालिका शाळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या गरजा जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
राज्यभर राबविण्यात आलेल्या या प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शाळांच्या परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नव्या स्वप्नांसह आणि नव्या उमेदीसह विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवासाला सुरुवात केली आहे.




