Love Bite Risk : ‘लव्ह बाईट’ ठरू शकतो जीवघेणा; मानेवरील अतिरेकी दाबामुळे ‘ब्रेन स्ट्रोक’चा वाढतो धोका?

spot_img

अतिप्रेमाचा हा आवेग थेट मेंदूचा रक्तपुरवठा रोखू शकतो; न्यूझीलंडमधील एका घटनेने वैद्यकीय जगतात खळबळबळ, तज्ज्ञांचा तातडीने डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला

प्रेम व्यक्त करण्याची ‘लव्ह बाईट’ (Hickey) ही पद्धत अनेकांसाठी सामान्य असली, तरी त्याचा अतिरेक थेट मृत्यूला आमंत्रण देऊ शकतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वसाधारणपणे मान, गळा किंवा खांद्यावर ओठांच्या अतिदाबामुळे पडणारा हा लाल डाग काही तासांत किंवा दिवसांत नाहीसा होतो. परंतु, याच लव्ह बाईटमुळे एका तरुणाचा जीव गेल्याची थरारक घटना न्यूझीलंडमध्ये घडली आहे. प्रेयसीने घेतलेल्या लव्ह बाईटमुळे तरुणाच्या गळ्याचा तो भाग सुन्न झाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक लव्ह बाईट धोकादायक नसतो, मात्र जर या डागाचा रंग लाल वरून जांभळा किंवा काळा-निळा पडू लागला, अथवा तिथे तीव्र वेदना व ठणक जाणवू लागली, तर ते अंतर्गत गंभीर इजेचे लक्षण असू शकते. अशावेळी घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तातडीने डॉक्टरांकडे धाव घेणे गरजेचे आहे.

मानवी शरीराच्या संरचनेत गळ्याचा भाग अत्यंत संवेदनशील असतो. वैद्यकीय भाषेत गळ्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या मुख्य नसांना ‘कॅरोटिड आर्टरी’ (Carotid Artery) म्हणजेच कॅरोटिड धमण्या म्हटले जाते. या धमण्या थेट मेंदूला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात. लव्ह बाईट दरम्यान जेव्हा या संवेदनशील नसांवर तीव्र आणि दीर्घकाळ दाब पडतो, तेव्हा ‘कॅरोटिड धमणी’ फाटण्याचा किंवा दबण्याचा मोठा धोका निर्माण होतो. नसा दबल्या गेल्यामुळे मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा अचानक खंडित होतो, ज्याला वैद्यकीय शास्त्रात ‘इस्केमिक स्ट्रोक’ (Ischemic Stroke) म्हणतात. या दाबामुळे नसांमध्ये अंतर्गत रक्त गोठून रक्ताची गाठ (Blood Clot) तयार होते. ही रक्ताची गाठ मेंदूपर्यंत पोहोचल्यास व्यक्तीला थेट अर्धांगवायूचा (Brain Stroke) झटका येऊ शकतो, चक्कर येऊ शकते किंवा शरीर सुन्न पडू शकते.

जर एखाद्याला लव्ह बाईटमुळे किरकोळ त्रास जाणवत असेल, तर प्राथमिक उपचार म्हणून सुरुवातीचे दोन ते तीन दिवस त्या भागावर बर्फाने हलक्या हाताने शेक द्यावा. त्यानंतर चौथ्या दिवसापासून कोमट पाण्याने हलका शेक दिल्यास तिथला रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. मात्र, हे उपाय करूनही जर डाग गडद होत गेला, सूज आली किंवा दुखणे थांबले नाही, तर अंतर्गत रक्तवाहिन्यांचे मोठे नुकसान झालेले असू शकते. अशा परिस्थितीत निष्काळजीपणा न करता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण वेळेवर मिळालेले उपचारच अशा गंभीर प्रकरणांमध्ये जीव वाचवू शकतात.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ