रील्स आणि शॉर्ट व्हिडिओजच्या अतिरेकामुळे तरुण पिढीची एकाग्रता धोक्यात; वाचा तुमच्यातही ही लक्षणे आहेत का?
आजच्या डिजिटल युगात आपण तंत्रज्ञानाच्या इतके आहारी गेलो आहोत की, सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपला हात मोबाईलवरून सुटत नाही. कामाच्या व्यापातून दोन मिनिटांचा वेळ मिळाला की लगेच इन्स्टाग्राम रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ स्क्रोल करणे ही आपली सहज प्रवृत्ती झाली आहे. जर तुम्हालाही फोनशिवाय काही मिनिटे शांत बसणे असह्य होत असेल, तर तुम्ही नकळतपणे ‘ब्रेन रॉट’ (Brain Rot) या मानसिक स्थितीचे बळी ठरत आहात. हा कोणताही वैद्यकीय आजार नसला, तरी सततच्या झटपट मनोरंजनामुळे मेंदूची विचार करण्याची आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता मंदावणे, यालाच डिजिटल भाषेत ‘ब्रेन रॉट’ म्हटले जाते.
सतत बदलणाऱ्या डिजिटल कंटेंटमुळे आपल्या मेंदूची सखोल विचार करण्याची सवय सुटत चालली आहे. कोणतीही नोटीफिकेशन आलेली नसतानाही वारंवार फोन तपासणे, एखादा व्हिडिओ पूर्ण न पाहता लगेच दुसरा व्हिडिओ लावणे, आणि मोठा लेख किंवा पुस्तक वाचण्याचा कंटाळा येणे ही याची प्राथमिक लक्षणे आहेत. इतकेच नव्हे, तर यामुळे लोकांची स्मरणशक्ती कमकुवत होत असून, अगदी काही वेळापूर्वी पाहिलेली गोष्टही लोक विसरू लागले आहेत. कोणत्याही विषयावर सखोल अभ्यास करण्याऐवजी लगेच आणि झटपट निष्कर्षावर पोहोचण्याची सवय तरुणांमध्ये वेगाने वाढत आहे.
या समस्येचा सर्वाधिक फटका तरुण पिढीला बसत आहे. शिक्षण, नोकरी आणि सामाजिक संपर्क या सगळ्या गोष्टी स्क्रीनवर आल्यामुळे तरुणांचा मेंदू सतत नवीन माहिती आणि उत्तेजनांच्या (Stimuli) शोधात असतो. परिणामी, त्यांच्यातील संयम आणि एकाग्रता संपत चालली आहे. यावर मात करण्यासाठी ‘डिजिटल डिटॉक्स’ म्हणजेच स्क्रीन टाईमवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
ब्रेन रॉटपासून स्वतःला वाचवण्यासाठी काही साधे पण प्रभावी उपाय:
सकाळी उठल्याबरोबर पहिले एक तास आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान एक तास फोन पूर्णपणे दूर ठेवा. दिवसाची सुरुवात मोबाईलऐवजी व्यायाम किंवा ध्यानाने करा.
जेवण करताना मोबाईल किंवा टीव्ही पाहणे पूर्णपणे टाळा, जेणेकरून अन्नाचा आणि जेवणाचा आनंद घेता येईल.
स्क्रीन स्क्रोल करण्याऐवजी पुस्तक वाचन, बागकाम, चालणे किंवा एखादा मैदानी छंद जोपासा, ज्यामुळे मेंदूला खरी विश्रांती मिळेल.
तंत्रज्ञान हे आपल्या सुविधेसाठी आहे, आपण त्याचे गुलाम बनू नये. योग्य वेळी डिजिटल सवयींवर नियंत्रण मिळवले नाही, तर मनोरंजनाचे हे साधन आपल्या मानसिक कार्यक्षमतेचे कधी नुकसान करेल, हे आपले आपल्यालाच समजणार नाही.




