CM Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीच्या पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार

spot_img

राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कर्जमाफीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्जमाफीसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्याची तयारी सुरू आहे. यासाठी संबंधित विभागांकडून आवश्यक प्रक्रिया आणि प्रशासकीय कामकाज वेगाने पूर्ण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीतील आंदोलनावरही भाष्य केले. काही आंदोलनांमध्ये चुकीच्या प्रवृत्तींचा शिरकाव होऊन परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप त्यांनी केला. काही राजकीय पक्ष आणि संघटना आंदोलनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी करत असल्याचेही त्यांनी म्हटले. आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचा उल्लेख करत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखली गेल्याचे त्यांनी सांगितले.

सदाभाऊ खोत यांच्या आंदोलनकर्त्यांबाबतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी, त्यांचे नेमके वक्तव्य आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, प्रत्येक आंदोलनात सहभागी असलेले सर्वजण एकाच विचारांचे नसतात. काही लोक प्रामाणिकपणे आपल्या मागण्यांसाठी लढतात, तर काही जण आंदोलनाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करण्याचा प्रयत्न करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर कर्जमाफीच्या प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ