महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण विस्कळीत असले तरी आता राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ ते २५ जुलैदरम्यान मुंबई, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. गुजरातच्या किनारपट्टीजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होत असून, उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असून या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि कोल्हापूर घाटमाथ्यासह विदर्भातील जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२२ जुलै रोजी पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला असून, कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर तसेच नाशिक, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. मुंबई आणि सिंधुदुर्गसह संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. २३ जुलै रोजी कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे, तर पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
२४ जुलै रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे व सातारा घाटमाथा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर २५ जुलैपासून राज्यातील पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टी आणि घाट परिसरात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार वारे, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस होऊ शकतो. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून नदी, धबधबे, घाट आणि दरडप्रवण भागात अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




