Devendra Fadnavis on Delhi LathiCharge : ‘परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार गरजेचाच!’; दिल्लीतील आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

spot_img

‘फेसलेस’ आंदोलनात अराजकता पसरवणाऱ्या प्रवृत्तींचा घुसपेठ; संविधानाने हक्कांसोबत जबाबदारीचीही आठवण करून दिल्याचे वक्तव्य

दिल्लीतील जंतरमंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले आहे. “आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कठोर पाऊल उचलणे गरजेचे होते, अन्यथा तिथे मोठा अनर्थ घडला असता,” असे स्पष्ट मत फडणवीस यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार सर्वांना असला, तरी संविधानाने दिलेल्या हक्कांसोबतच नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्यांचेही भान ठेवले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

दिल्लीतील हे आंदोलन कोणत्याही स्पष्ट नेतृत्वाशिवाय म्हणजेच ‘फेसलेस’ सुरू असून, त्यात काही लोक आपला वेगळा अजेंडा घेऊन शिरले असल्याचा आरोप त्यांनी केला. शांततापूर्ण मार्गाने आणि रीतसर परवानगी घेऊन होणाऱ्या आंदोलनांना सरकारचा विरोध नाही. परंतु, परवानगी न घेता राजकीय अशांतता आणि हिंसाचार निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई अटळ आहे. पोलिसांच्या गाड्या फोडणे, त्या उलटवणे आणि पोलिसांवर दगडफेक करणे यांसारख्या घटना घडल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी खूप मोठा संयम दाखवला, कारण कोणत्याही सरकारला आपल्याच नागरिकांवर लाठीचार्ज करायला आवडत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

आंदोलनात सहभागी असलेल्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री म्हणाले की, “या आंदोलनात अनेक ‘हौशे-गौशे-नवशे’ आणि स्वतःचा स्वार्थ साधणारे लोक घुसले आहेत, ज्यांना नीट (NEET) परीक्षा काय आहे किंवा ती कधी झाली याची पुसटशी कल्पनाही नाही. अशा प्रवृत्ती आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देशात अराजकता माजवत आहेत.” या आंदोलनात प्रामाणिक हेतूने आलेले काही तरुण असले, तरी अनेक रिजेक्ट झालेल्या राजकीय पक्षांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी यात उडी घेतल्याचा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ