Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात हलवण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

spot_img

पत्नी गीतांजली यांच्या याचिकेवर कोर्टाचा निर्णय; केंद्र सरकारचीही मेदांता रुग्णालयातील उपचारांना सहमती

दिल्लीतील जंतरमंतरवर नीट (NEET) परीक्षा आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा मुख्य चेहरा ठरलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी वांगचुक यांना आंदोलनाच्या ठिकाणावरून बळजबरीने उठवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांना दिल्लीतील प्रसिद्ध ‘मेदांता’ या खासगी रुग्णालयात पुढील वैद्यकीय उपचारांसाठी हलवण्यात येणार आहे.

सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी सरकारी यंत्रणांच्या भूमिकेवर अविश्वास दाखवत दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सफदरजंग रुग्णालयात वांगचुक यांच्यावर कडक पोलीस पहारा ठेवण्यात आला होता आणि त्यांच्या भेटीगाठींवर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, पतीला योग्य आणि पसंतीच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी मागणी गीतांजली यांनी न्यायालयात केली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही मागणी मान्य करत वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात स्थानांतरित करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

यासोबतच, सोनम वांगचुक यांच्या उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पॅनेल स्थापन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मेदांता रुग्णालयाला दिले आहेत. वांगचुक यांचे आतापर्यंतचे सर्व वैद्यकीय अहवाल (Medical Reports) या पॅनेलला सोपवले जातील. सुनावणीदरम्यान केंद्र सरकारनेही आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, वांगचुक यांनी त्यांच्या पसंतीचे रुग्णालय निवडण्यास सरकारचा कोणताही विरोध नाही; परंतु प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेता डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ नये. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि डॉक्टरांचे मत विचारात घेऊन कोर्टाने वांगचुक यांच्या प्रकृतीवर सतत वैद्यकीय देखरेख ठेवणे गरजेचे असल्याचे नमूद केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ