Pune : नाणेघाटात पाय घसरून दरीत पडून एका पर्यटकाचा मृत्यू

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:रमेश तांबे

जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध नाणेघाट परिसरातील नानाचा अंगठा येथे फिरण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी एका तरुणाचा पाय घसरून खोल दरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २० जुलै रोजी घडली असून, २१ जुलै रोजी मुरबाड येथील सह्यगिरी रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनंतर तरुणाचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले. दत्ता विनायक लोंढे (वय २२, रा. पारगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता लोंढे हा तेजस काटे, सुनील पवार आणि अनिकेत ढोबळे या मित्रांसह नानाचा अंगठा परिसरात फिरण्यासाठी गेला होता. मात्र, अर्धवट वाटेतून परत जाण्याचे सांगून निघालेला दत्ता पार्किंगच्या ठिकाणी परतला नाही. त्यामुळे मित्रांनी स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला. घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलिस, वन विभाग, आपदा पथक आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. दाट धुके, पाऊस आणि वाऱ्यामुळे दरीत शोध घेण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. घटनास्थळी दत्ताची एक चप्पल तसेच घसरल्याच्या खुणा आढळल्याने तो पाय घसरून दरीत कोसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

२१ जुलै रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. मुरबाड येथील दीपक विशे यांच्या नेतृत्वाखालील सह्यगिरी रेस्क्यू टीमच्या कुसुम विशे, संदेश गपाट, हेमंत ठोंबरे, रामदास ठोंबरे, मारुती वाघ, हरी लोबी आणि समीर ठोंबरे यांनी सुमारे साडेतीन तास अथक प्रयत्न करून सकाळी साडेनऊच्या सुमारास घोणे घाट परिसरातून तरुणाचा मृतदेह शोधून बाहेर काढला. या बचावकार्यात जुन्नर पोलीस, वन विभाग आणि आपदा पथकांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, सह्यगिरी रेस्क्यू टीमने यावर्षी आतापर्यंत अनेक बचावकार्ये केली असून, त्यापैकी काही घटनांमध्ये मृतदेह शोधून काढण्यात आले आहेत. डोंगराळ आणि धोकादायक पर्यटनस्थळी फिरताना पर्यटकांनी अतिउत्साह किंवा धाडस न करता प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, तसेच हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ