Karale Guruji : CJP आंदोलनावरून नितेश कराळे गुरुजींचा संताप; माणिकराव ठाकरेंना राहुल गांधींच्या अनुपस्थितीवरून सवाल

spot_img

यूट्यूबच्या माध्यमातून लोकप्रिय झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातही सक्रिय होण्याचा प्रयत्न करणारे नितेश कराळे गुरुजी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा करताना विरोधी पक्षाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

दिल्लीमध्ये CJPच्या नेतृत्वाखाली तरुणांनी मोठ्या संख्येने आंदोलन केले. मात्र, या आंदोलनाला विरोधी पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहिले नसल्याचा मुद्दा कराळे गुरुजी यांनी उपस्थित केला. यापूर्वी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी उपस्थिती लावली होती, मग CJPच्या आंदोलनावेळी राहुल गांधी किंवा इतर प्रमुख नेते का दिसले नाहीत, असा सवाल त्यांनी माणिकराव ठाकरे यांना केला.

या चर्चेदरम्यान कराळे गुरुजी यांनी आंदोलनासाठी महत्त्वाचे दिवस असतानाही राहुल गांधी आंदोलनस्थळी का आले नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला. हजारो विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना विरोधी पक्षाने त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे यायला हवे होते, अशी त्यांची भूमिका होती. आंदोलनकर्त्यांच्या परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

माणिकराव ठाकरे यांनी राहुल गांधी फोटोसेशनसाठी आंदोलनात सहभागी होत नसल्याचे सांगितले. त्यावर कराळे गुरुजी यांनी, मुद्दा फोटोसेशनचा नसून आंदोलनाच्या वेळी उपस्थित राहून आंदोलकांना पाठिंबा देण्याचा आहे, असे स्पष्ट केले. भाजपविरोधातील रोष विरोधकांच्या मनात असल्याचे सांगत, विरोधी पक्षाचे नेते प्रत्यक्ष मैदानात उतरले असते तर राजकीय परिस्थितीत मोठा बदल घडू शकला असता, असा दावा त्यांनी केला.

या चर्चेदरम्यान दोघांमध्ये काही वेळ तीव्र शाब्दिक वाद झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असून, कराळे गुरुजींच्या आक्रमक भूमिकेमुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ