दिल्लीच्या ऐतिहासिक जंतरमंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) संसदेवरील मोर्च्यादरम्यान झालेल्या पोलीस लाठीमारानंतर संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईत अनेक आंदोलक तरुण-तरुणी गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही उमटत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर आमदारांमध्ये जुंपली असून, सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांना थेट ‘आतंकवादी’ म्हटल्यामुळे नवा वाद पेटला आहे.
आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांची तुलना दहशतवाद्यांशी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्णपणे फेटाळून लावली. “पेपरफुटी प्रकरणामागे निश्चितच षड्यंत्र असून सरकार दोषींवर कडक कारवाई करत आहे. जे विद्यार्थी खरोखर उत्तीर्ण झाले आहेत ते प्रवेश प्रक्रियेत व्यस्त आहेत, मात्र ज्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही ते राजकीय फायद्यासाठी राजीनाम्याची मागणी करत आहेत. ‘केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणात धर्मेंद्र’ हे उत्तम काम करत असून, विरोधक देशात दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत. त्यामुळे सरकारने या आतंकवाद्यांसमोर न झुकता त्यांना लोकशाही मार्गाने सडेतोड उत्तर द्यावे आणि शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मुळीच घेऊ नये,” असे विधान खोत यांनी केले.
सदाभाऊ खोत यांच्या या वादग्रस्त विधानाचा आमदार बच्चू कडू यांनी चांगलाच समाचार घेतला. “खोत यांचे विधान अत्यंत चुकीचे आणि बेजबाबदार असून त्यांनी ते तत्काळ मागे घेऊन दुरुस्ती करावी. आंदोलन हा आपल्या देशाचा आत्मा आहे आणि याच आंदोलनांच्या बळावर देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे,” असे सांगत त्यांनी खोत यांचे कान उघाडले. तसेच विद्यार्थ्यांनी राजीनाम्यासोबतच शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर भर द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
दुसरीकडे, मंत्री शंभूराज देसाई यांनी मधला मार्ग काढत कायदा हातात घेण्यावर टीका केली, पण खोत यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली. “लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पोलिसांनी गाड्या फोडणे किंवा ५-६ पोलिसांना जखमी करणे चुकीचे असले, तरी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘आतंकवादी’ म्हणणे अजिबात योग्य नाही,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.




