Rahul Gandhi On Jantar Mantar Protest : ‘मोदी, शहा आणि प्रधानांनी राजीनामा द्यावा!’; विद्यार्थ्यांवरील लाठीमारावरून राहुल गांधी आक्रमक, पंतप्रधानांकडून जाहीर माफीची मागणी

spot_img

संसदेत चर्चेची मागणी फेटाळल्याने विरोधक आक्रमक; राहुल-प्रियांका गांधींनी रुग्णालयात जाऊन घेतली जखमी आंदोलकांची भेट

दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर २० जुलै रोजी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटत असून, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “या अमानुष लाठीमाराची जबाबदारी स्वीकारून केवळ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीच नाही, तर गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तत्काळ राजीनामा दिला पाहिजे,” अशी थेट मागणी त्यांनी केली आहे. तसेच, देशातील तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंतप्रधानांनी या प्रकरणावर देशभरातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी, असा घणाघातही त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “आम्ही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर मुद्द्यावर संसदेत तत्काळ चर्चा घडवून आणण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी सरकारशी बोलून निर्णय घेण्याचे सांगितले. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागले असताना आणि त्यांच्यावर लाठ्या चालवल्या जात असताना पंतप्रधान मौन बाळगून कसे बसू शकतात? देशातील शिक्षणव्यवस्थेची झालेली दुरवस्था सर्वांना ठाऊक आहे आणि अशा वेळी तरुणांवर लाठीमार करणे ही अत्यंत चुकीची पद्धत आहे.”

शिक्षणाच्या खासगीकरणावर आणि राजकीय हस्तक्षेपावर ताशेरे ओढताना राहुल गांधी म्हणाले की, “शिक्षण व्यवस्थेवर उद्योगपतींचा प्रभाव वाढला असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विद्यापीठांवर ताबा मिळवला आहे. कुलगुरूपदी प्रचारकांची नियुक्ती केली जात आहे. दुसरीकडे तरुणांकडे रोजगाराच्या किंवा व्यवसायाच्या संधी उरलेल्या नाहीत.” दरम्यान, राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी ‘आरएमएल’ (RML) रुग्णालयात जाऊन पोलिसांच्या लाठीमारात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांना पाठिंबा दर्शवला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ