स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या कार्यक्रमातील काही वक्तव्यांमुळे निर्माण झालेला वाद आता अधिकच चिघळला आहे. कार्यक्रमातील एका व्हायरल क्लिपनंतर आधीच चर्चा रंगली असताना, त्याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या डॉ. सेजल पवार यांच्या अवयवदान आणि मृतदेहासंदर्भातील वक्तव्यांवरून नवीन वाद निर्माण झाला. या वक्तव्यामुळे समाजातील विविध घटकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आणि सोशल मीडियावर याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
या संदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. प्राथमिक चौकशीसाठी वरिष्ठ प्राध्यापकांची तथ्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. दरम्यान, डॉ. सेजल पवार यांनी सार्वजनिकरीत्या माफीही मागितली होती. मात्र, त्यानंतरही KEM रुग्णालय प्रशासनाने कठोर भूमिका घेत त्यांना १५ दिवसांसाठी रुग्णालयात येण्यास बंदी घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात घडामोडी वेगाने सुरू असून चौकशीच्या निष्कर्षांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




