बॉलिवूडपासून मराठी सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच लागलंय या फॅशनचं वेड!
सध्याच्या वेगवान युगात फॅशनची व्याख्या दररोज बदलत आहे. आजच्या तरुणाईला केवळ सुंदर आणि स्टायलिश दिसणे पुरेसे नसून, कपड्यांमध्ये मिळणारा आरामही (Comfort) तितकाच महत्त्वाचा वाटू लागला आहे. याच गरजीतून सध्या फॅशन जगतात ‘पॉलिश्ड ऍथलेझर’ (Polished Athleisure) हा एक नवा ट्रेंड प्रचंड गाजतोय. ‘ऍथलेझर’ हा शब्द ऍथलेटिक (खेळाचे कपडे) आणि लेझर (आराम) या दोन शब्दांच्या मिलाफातून तयार झाला आहे. जिम, योगा किंवा वर्कआउटचे कपडे केवळ व्यायामापुरते मर्यादित न ठेवता, ते अत्यंत नीटनेटके आणि स्टाईलिश पद्धतीने दैनंदिन जीवनात वापरणे म्हणजेच ‘पॉलिश्ड ऍथलेझर’ होय. या फॅशनचे वैशिष्ट्य म्हणजे यात वापरले जाणारे कपडे हलके आणि मऊ असतात, पण ते अवाजवी सैलसर नसून शरीराला व्यवस्थित फिट बसतात, ज्यामुळे एक परफेक्ट लूक मिळतो.
यात भडक रंगांऐवजी ब्लॅक, ऑलिव्ह ग्रीन किंवा नेव्ही ब्लू अशा मोनोक्रोमॅटिक (एकाच रंगाच्या) कॉ-ऑर्ड सेट्सना तरुण अधिक पसंती देत आहेत. या कपड्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही जिम किंवा योगा क्लास संपवून थेट कॅफे, ऑफिस किंवा मॉलमध्ये जाऊ शकता. सध्या बॉलिवूडसह अनेक मराठी सेलिब्रिटींमध्येही हा लुक टॉपवर आहे. चांगल्या दर्जाच्या ट्रॅक पँट्स किंवा लेगिंग्ससोबत फॅशनेबल स्नीकर्स, गॉगल आणि एखादी छानशी बॅग कॅरी करून हा लूक अधिक ‘पॉलिश्ड’ आणि अपग्रेड केला जातो. कम्फर्ट आणि क्लास यांचे उत्तम कॉम्बिनेशन असलेली ही फॅशन तुम्हाला दिवसभर रिलॅक्स ठेवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरत आहे.




