महागाईच्या काळात मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी चक्रवाढ व्याजाची कमाल; जाणून घ्या वयानुसार किती रुपयांची SIP करावी लागेल
आजच्या काळात सातत्याने वाढणारी महागाई पाहता, आपल्या मुलांचे उच्च शिक्षण आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हे प्रत्येक पालकासमोरील सर्वात मोठे आव्हान बनले आहे. अनेक पालक तर मुलाच्या जन्माआधीपासूनच वेगवेगळ्या गुंतवणुकीचे नियोजन करू लागतात. जर तुम्हालाही तुमच्या मुलाच्या भविष्याची चिंता असेल आणि तुमचे मूल जेव्हा १८ वर्षांचे होईल, तेव्हा त्याच्या बँक खात्यात तब्बल १ कोटी रुपये असावेत अशी तुमची इच्छा असेल, तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) टूल ‘ChatGPT’ ने यासाठी एक अतिशय सोपी आणि प्रभावी रणनीती (Strategy) तयार केली आहे. चक्रवाढ व्याजाच्या (Compound Interest) ताकदीचा वापर करून अगदी लहान वयात मुलाच्या नावावर मोठा फंड कसा उभा करता येईल, याचा कानमंत्र याद्वारे देण्यात आला आहे.
ChatGPT च्या विश्लेषणानुसार, जर पालकांनी दीर्घ मुदतीसाठी इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये (Equity Mutual Funds) गुंतवणूक केली, तर वार्षिक सरासरी १२ टक्के परतावा (Return) मिळणे फारसे कठीण नाही. यासाठी सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ‘गुंतवणुकीची लवकरात लवकर सुरुवात करणे’. जर पालकांनी मुलाचा जन्म होताच त्याच्या नावाने दरमहा ८,००० ते १०,००० रुपयांची एसआयपी (SIP) सुरू केली, तर मूल १८ वर्षांचे होईपर्यंत तो सहज करोडपती बनू शकतो. याउलट, “अजून मूल लहान आहे, पुढे कधीतरी गुंतवणूक करू” असा विचार करणे ही पालकांची सर्वात मोठी चूक ठरू शकते; कारण जितका उशीर होईल, तितका गुंतवणुकीचा आर्थिक बोजा वाढत जातो.
जर तुम्ही मूल ५ वर्षांचे झाल्यानंतर ही एसआयपी सुरू केली, तर त्याला १८ व्या वर्षी करोडपती बनवण्यासाठी तुम्हाला दरमहा थेट १५,००० ते १८,००० रुपयांची मोठी गुंतवणूक करावी लागेल. तसेच, जर आणखी उशीर झाला आणि मूल १० वर्षांचे झाल्यानंतर तुम्ही गुंतवणूक सुरू केली, तर १ कोटींचे लक्ष्य गाठण्यासाठी दरमहा ३५,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेची एसआयपी भरावी लागेल. मात्र, ज्या पालकांना सुरुवातीलाच दरमहा ८,००० रुपये गुंतवणे शक्य नाही, त्यांनी निराश होण्याची गरज नाही. ते दरमहा केवळ ६,००० रुपयांपासूनही सुरुवात करू शकतात. फक्त यात दरवर्षी आपली एसआयपी रक्कम १० टक्क्यांनी वाढवत जाणे (Step-up SIP) गरजेचे आहे. यामुळे पालकांवर एकदम ताण पडत नाही आणि उत्पन्न वाढेल तशी गुंतवणूकही वाढते.
या रणनीतीसोबतच ChatGPT ने पालकांना एका महत्त्वाच्या वास्तवाची जाणीव करून दिली आहे, ती म्हणजे ‘महागाई’ (Inflation). आजच्या १ कोटी रुपयांचे मूल्य १८ वर्षांनंतर नक्कीच कमी झालेले असेल. त्यामुळे जर मुलाला भविष्यात परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवायचे असेल किंवा एखादा मोठा व्यवसाय सुरू करून द्यायचा असेल, तर पालकांनी केवळ १ कोटींचे ध्येय न ठेवता, महागाईचा दर गृहीत धरून १.५ कोटी ते २ कोटी रुपयांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आजपासूनच गुंतवणुकीला सुरुवात केली पाहिजे.




