EPFO च्या EDLI योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतोय बंपर फायदा; निवृत्तीपूर्वी पैसे काढण्याचे नियमही झाले सोपे
भारतातील पगारदार वर्गासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) हे सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक कवच मानले जाते. ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना’ (EPFO) द्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजनेत दरमहा कर्मचाऱ्याच्या मूळ पगारातून काही हिस्सा कापला जातो आणि तेवढीच रक्कम कंपनीकडूनही जमा केली जाते. या साठलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याज मिळून भविष्यासाठी एक मोठा निधी तयार होतो. मात्र, बहुतांश कर्मचाऱ्यांना हे माहितच नसते की, या पीएफ खात्यासोबत त्यांना तब्बल ७ लाख रुपयांचे विशेष विमा संरक्षण पूर्णपणे मोफत मिळते. तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी या महत्त्वपूर्ण विमा योजनेचे नियम आणि पात्रता निकष प्रत्येक नोकरदाराने समजून घेणे गरजेचे आहे.
EPFO ने आपल्या ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ३.०’ सुधारणांतर्गत नोकरदारांना मोठा दिलासा दिला आहे. या नव्या डिजिटल सुधारणांमुळे कर्मचाऱ्यांना आता निवृत्तीपूर्वीच पीएफची रक्कम काढणे अत्यंत सोपे झाले आहे. कागदपत्रांची कटकट कमी करून ऑनलाइन प्रक्रियेला गती देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे, जेणेकरून तातडीच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या दाव्यांचा निपटारा जलद गतीने होईल. या सुलभ खात्यासोबतच कर्मचाऱ्यांना ‘कर्मचारी डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स’ (EDLI) या विशेष योजनेचा लाभ आपोआप मिळतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विम्यासाठी कर्मचाऱ्याला आपल्या खिशातून एकही अतिरिक्त रुपया द्यावा लागत नाही.
या विमा योजनेच्या नियमांनुसार, जर एखाद्या पीएफ खातेधारक कर्मचाऱ्याचा सेवाकाळात (नोकरीवर असताना) दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचा नॉमिनी (वारसदार) या विम्याच्या रकमेवर दावा करू शकतो. संकटाच्या काळात कुटुंबाला तात्काळ मदत मिळावी म्हणून अवघ्या २० दिवसांच्या आत हा दावा निकाली काढण्याचा प्रयत्न केला जातो. या अंतर्गत नॉमिनीला किमान २.५ लाख रुपये आणि कमाल ७ लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभ मिळतो. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या १२ महिन्यांच्या सरासरी वेतनावर आणि पीएफ खात्याच्या स्थितीवर ठरवली जाते.
या विम्याचा संपूर्ण खर्च कंपनी उचलते. नियोक्ता (कंपनी) कर्मचाऱ्याच्या पगाराच्या ०.५ टक्के रक्कम या विमा निधीमध्ये जमा करत असते. विम्याच्या लाभाची गणना करताना कर्मचाऱ्याच्या सरासरी मासिक पगाराची ३५ पट (कमाल मर्यादा १५,००० रुपयांपर्यंत) आणि सरासरी पीएफ बॅलन्सच्या ५० टक्के रक्कम एकत्र केली जाते. यामध्ये पीएफ बॅलन्सशी जोडलेल्या अतिरिक्त रकमेची कमाल मर्यादा १.७5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचे तर, ईपीएफ हे केवळ निवृत्तीनंतरच्या बचतीचे साधन नसून नोकरीत असताना कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणारे एक भक्कम कवच आहे.




