शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. या घडामोडींमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव विशेष चर्चेत आले असून, त्यांच्या भूमिकेबाबत विविध राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. ठाकरे गटातील निष्ठावंत चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधण्याची आणि त्यांना दिल्लीतील राजकीय चर्चांमध्ये सहभागी करून घेण्याची जबाबदारी एका वरिष्ठ मंत्र्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील एका प्रभावशाली मंत्र्याने निंबाळकर यांच्याशी संवाद साधत त्यांना दिल्लीपर्यंत नेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे. संबंधित मंत्री धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांचा आणि ओमराजे निंबाळकर यांचा पूर्वीपासून संपर्क असल्याचीही चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळीच त्यांची दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. स्थानिक नागरिक, शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांमध्येही या विषयावर चर्चा रंगत असून, अनेकांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावरील विश्वास कायम असल्याचे मत व्यक्त केले आहे. काही कार्यकर्त्यांनी ते मतदारांच्या अपेक्षांशी प्रामाणिक राहतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे संभाव्य बंडाच्या चर्चांमध्ये त्यांचे नाव असले तरी स्थानिक पातळीवर त्यांना मिळणारा पाठिंबा कायम असल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काही दिवसांत या राजकीय घडामोडींना कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




