महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ६ खासदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत ठाण मांडून असून, त्यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. हे ६ बंडखोर खासदार लवकरच स्वतंत्र गटाचे पत्र लोकसभा अध्यक्षांना देणार असल्याचे समजते, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पक्षफुटी रोखण्यासाठी ठाकरे गटाने तातडीने व्हिप जारी केला असून खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी दिल्लीत धाव घेतली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाला एक गंभीर वळण देत खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. देशात लोकशाहीची थट्टा उडवत खासदारांना धमकावून फोडले जात असल्याचा दावा त्यांनी केला. विशेषतः ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचा वापर करून त्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ओमराजे यांच्या वडिलांच्या (पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या) २० वर्षांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा निकाल न्यायालय देणार होता. राऊत यांच्या आरोपानुसार, दिल्लीत आलेल्या एका बड्या नेत्याच्या मध्यस्थीने ओमराजेंना धमकी देण्यात आली आहे की, ‘जर कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने हवा असेल, तर आमच्या गटात सामील व्हा आणि सही करा.’ याच राजकीय दबावामुळे कोर्टाचा निकाल दोन दिवसांसाठी राखून ठेवण्यात आला, असा गंभीर आरोप करत संजय राऊत यांनी देशातील कायदा, संविधान आणि न्यायव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.




