श्रीकांत शिंदेंच्या नावावर दोन खाजगी विमाने बुक; मध्यरात्री १ वाजता खासदार दिल्लीकडे रवाना झाल्याने खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत असून ठाकरे गटाच्या खासदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी पडद्यामागे मोठ्या प्रमाणावर ‘ऑपरेशन’ सुरू असल्याचे चित्र आहे. शिवसेना (ठाकरे गट) च्या काही खासदारांना थेट चार्टर्ड विमानाने दिल्लीला नेण्यात आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर हे दिल्लीत दाखल झाले असून या संपूर्ण मोहिमेची सूत्रे कोणाच्या हातात आहेत, याबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. या खासदारांसाठी थेट खाजगी विमानांची व्यवस्था करण्यात आली असून, त्यामागील पडद्यामागील मुख्य चेहरा आता समोर आल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या खळबळजनक माहितीनुसार, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे रात्री १ वाजता पुण्याहून खासगी विमानाने दिल्लीकडे रवाना झाले. विशेष म्हणजे, काल दुपारपासूनच त्यांच्या दिल्ली दौऱ्याचे नियोजन वारंवार बदलत होते. आधी दुपारी ३, नंतर ५ आणि रात्री ९ वाजता विमानाचे उड्डाण होणार होते; परंतु अखेर सर्व गुप्तता पाळत मध्यरात्री १ वाजता हे विमान दिल्लीसाठी रवाना झाले. या दौऱ्यात माजी मंत्री तानाजी सावंत आणि जयराजे निंबाळकर हे देखील ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत एकाच विमानाने दिल्लीला गेल्याची माहिती आहे.
या संपूर्ण राजकीय भूकंपामागील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे, या खासदारांना दिल्लीत पोहोचवण्यासाठी पुणे विमानतळावर चक्क दोन खासगी विमाने सज्ज ठेवण्यात आली होती. या दोन्ही विमानांचे बुकिंग आणि सर्व पूर्वतयारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावावर करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून समजते. एका विशिष्ट नेत्याच्या नावावर थेट विमानांचे बुकिंग होणे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी मध्यरात्री दिल्ली गाठणे, यावरून शिवसेनेत पुन्हा एकदा मोठी “फोडाफोडी” करण्याची रणनीती अंतिम टप्प्यात आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. येत्या काही तासांत दिल्लीत होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या गुप्त बैठकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा एखादा मोठा निर्णय किंवा अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.




