Beed : केज हत्याकांडाचे पडसाद विधानसभेत; धनंजय मुंडेंची सखोल चौकशीची मागणी

spot_img

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या विलास घुले हत्याकांडाचे पडसाद आता राज्याच्या विधिमंडळातही उमटू लागले आहेत. या प्रकरणावरून विधानसभा सभागृहात चर्चा रंगली असून परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी या हत्येमागील मुख्य सूत्रधाराला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

20 जूनच्या रात्री केज तालुक्यात घडलेल्या या घटनेत एका व्यक्तीवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, वाद मिटवण्यासाठी आणि संबंधितांना सोडवण्यासाठी पुढे आलेल्या विलास घुले यांच्यावरच हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून घुले कुटुंबीयांना न्याय मिळावा या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी पोलिसांनी या प्रकरणातील प्रत्येक पैलूची तपासणी करून कटामागील खरा मास्टरमाईंड कोण आहे, याचा शोध घ्यावा, अशी मागणी केली. दरम्यान, राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनीही ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता दोषींविरोधात कठोर आणि निष्पक्ष कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले.

या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून तपासातून पुढे कोणती माहिती समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ