Uddhav Thackeray : बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची थेट एन्ट्री; संघटनाबांधणीसाठी 28 जूनपासून विशेष दौरा

spot_img

उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षातील काही खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मोठे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी थेट जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून 28 जूनपासून विशेष दौऱ्याची आखणी करण्यात आली आहे. या दौऱ्यात ते बंडखोरी झालेल्या मतदारसंघांमध्ये जाऊन पक्षाची ताकद पुन्हा उभी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे ईशान्य मुंबई, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशीम आणि शिर्डी या मतदारसंघांना भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांशी थेट संवाद साधतील. तसेच पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीबाबत मार्गदर्शन करत संघटनात्मक बांधणीवर भर देणार आहेत. पक्षात निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी संबंधित मतदारसंघांमध्ये तयारीला वेग आला आहे. विविध बैठका, कार्यकर्ता मेळावे, स्वागत कार्यक्रम तसेच बॅनर आणि मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे. स्थानिक नेते आणि पदाधिकारी दौऱ्याच्या नियोजनात व्यस्त असून मोठ्या प्रमाणात गर्दी जमविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

यापूर्वीही उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर चर्चा करण्यात वेळ न घालवता संघटना बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले होते. आता या दौऱ्याच्या माध्यमातून ते पक्षाच्या पुनर्बांधणीला नवे बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ