Rajendra Raut Wins : सोलापूर विधान परिषदेत भाजपचा दणदणीत विजय; राजेंद्र राऊत यांची एकहाती बाजी

spot_img

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपने अपेक्षेप्रमाणे दमदार कामगिरी करत विजयाची नोंद केली आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) समर्थित उमेदवार वसंतराव देशमुख यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत ही निवडणूक एकतर्फी केल्याचे चित्र दिसून आले. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्हाभर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांना तब्बल 483 मते मिळाली, तर वसंतराव देशमुख यांना केवळ 118 मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे राऊत यांनी 365 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत आपली राजकीय ताकद अधोरेखित केली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच राऊत यांची आघाडी कायम होती आणि शेवटपर्यंत ती अधिक भक्कम होत गेली.

सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी एकूण 616 मतदार पात्र होते. त्यापैकी 614 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे 99.68 टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घेतल्याने या निवडणुकीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

विशेष म्हणजे भाजपच्या दोन मतदारांना मतदान करता आले नसतानाही पक्षाच्या उमेदवाराने मोठ्या फरकाने विजय मिळवला. या निकालातून जिल्ह्यातील भाजपची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याची चर्चा आहे. आगामी स्थानिक आणि राजकीय निवडणुकांच्या दृष्टीने हा विजय भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात असून विरोधकांसाठी मात्र आत्मपरीक्षणाचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ