मॉडेल समरीन कौरसोबतच्या कथित वादाच्या अफवांना पूर्णविराम; इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याच्या बातम्याही निघाल्या खोट्या.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियासोबत आयर्लंड दौऱ्यावर दाखल झाला आहे. मैदानावर तो आपल्या गोलंदाजीने कमाल दाखवण्यासाठी सज्ज असतानाच, दुसरीकडे सोशल मीडियावज त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत वेगवेगळ्या उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे. अर्शदीप सिंग आणि त्याची कथित गर्लफ्रेंड म्हणजेच प्रसिद्ध मॉडेल व अभिनेत्री समरीन कौर यांच्यात दुरावा निर्माण झाला असून, त्या दोघांचं ब्रेकअप झाल्याचे दावे नेटिझन्सकडून केले जात आहेत. इतकंच नव्हे तर, या दोघांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एकमेकांना ‘अनफॉलो’ केल्याची आवई देखील उठवली जात आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे सर्व दावे आणि चर्चा पूर्णपणे चुकीच्या आणि तथ्यहीन असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
अर्शदीप सिंग आणि समरीन कौर यांच्यात ब्रेकअप वगैरे काहीही झालेलं नसून, त्यांनी एकमेकांना अनफॉलो केल्याच्या बातम्यांमध्येही कोणताही दम नाही. प्रत्यक्ष पडताळणी केली असता, ते दोघेही अजूनही इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत असल्याचं दिसून येत आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामादरम्यान अर्शदीप आणि समरीन अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. विमानतळापासून ते टीम हॉटेलपर्यंत त्यांना अनेकदा एकत्र पाहिले गेले. इतकेच नाही तर, समरीन कौर पंजाब किंग्स संघाच्या अधिकृत बसमध्येही दिसल्याचा दावा केला गेला होता, ज्यावरून त्यावेळी सोशल मीडियावर बराच वाद आणि चर्चा रंगली होती. याच कारणामुळे त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती आणि आता आयपीएल संपल्यानंतर अचानक त्यांच्यात बिनसल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या गेल्या.
अर्शदीप सिंगचा हा दुसरा आयर्लंड दौरा असून, यापूर्वी २०२३ मध्ये तो भारतीय संघासोबत येथे आला होता. त्यावेळी खेळलेल्या २ टी-२० सामन्यांत त्याने २ बळी घेतले होते. आयर्लंडमधील ही संक्षिप्त मालिका संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे, जिथे अर्शदीपने आतापर्यंत केवळ एकच टी-२० सामना खेळला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडमधील खेळपट्ट्या या वेगवान गोलंदाजांसाठी पोषक मानल्या जातात. त्यामुळे या दौऱ्यात अर्शदीप सिंग आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी करेल आणि या निरर्थक अफवांना आपल्या खेळाने चोख उत्तर देईल, अशी अपेक्षा सर्व भारतीय क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.




