लोकल ट्रेनमधील हत्येच्या घटनेनंतर अवघ्या ४८ तासांत दुसरी धक्कादायक घटना; मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
लोकल ट्रेनमध्ये एका २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. माहिम रेल्वे स्थानकाच्या बाहेर केवळ चालताना धक्का लागल्याच्या कारणावरून एका ३५ वर्षीय तरुणावर अज्ञात हल्लेखोराने चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. विशेष म्हणजे पीडित तरुणाने आदरपूर्वक ‘सॉरी’ म्हटले असतानाही, हल्लेखोराने मोबाईल फुटल्याचा खोटा कांगावा करत हा रक्तरंजित थरार घडवला. या गंभीर हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला तात्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन प्रसन्ना (वय ३५) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. नवीन हा माहिम पश्चिम येथील पितांबर लेन भागात राहणारा असून, तो लोअर परळ येथील एका जाहिरात, मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत कार्यालयीन कर्मचारी (ऑफिस बॉय) म्हणून कार्यरत आहे. २५ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास नवीन ऑफिसचे काम संपवून लोकलने माहिम स्टेशनवर पोहोचला. स्टेशनबाहेर पडत असताना पादचाऱ्यांच्या गर्दीत त्याचा एका अज्ञात व्यक्तीला चुकून धक्का लागला. नवीनने तात्काळ आपली चूक मान्य करत माफीही मागितली.
मात्र, त्या अज्ञात व्यक्तीने नवीनसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. धक्का लागल्यामुळे माझा मोबाईल खाली पडून फुटला आहे, असा दावा करत त्याने नवीनकडे पैशांची मागणी केली. नवीनने नुकसानभरपाई देण्यास नकार देताच, त्या माथेफिरूने कमरेचा धारदार चाकू काढून नवीनच्या पोटावर आणि शरीरावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भयानक होता की नवीन गंभीर जखमी होऊन जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तर आरोपीने गुन्ह्यानंतर रेल्वे मार्गाचा वापर करून घटनास्थळावरून पळ काढला. नवीनच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, या प्राणघातक हल्ल्यानंतर नवीन तब्बल १५ तास बेशुद्ध अवस्थेत होता.
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच माहिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) अंतर्गत हत्येचा प्रयत्न करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासानुसार, हल्ला करणारा आरोपी हा अंमली पदार्थांच्या आहारी गेलेला (ड्रग अडिक्ट) असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे सर्वसामान्य मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




