Rohit Shetty : रोहित शेट्टीला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून २० कोटींची धमकी; ऑडिओ क्लिपमध्ये फरार आरोपी शुभम लोणकरचा आवाज असल्याचा संशय

spot_img

जुहूतील घराबाहेरील गोळीबारानंतर पुन्हा खळबळ; ९० सेकंदांच्या कॉलमध्ये पैशांसाठी थेट जीवे मारण्याचा इशारा

बॉलिवूडचा प्रसिद्ध ‘ॲक्शन डायरेक्टर’ रोहित शेट्टी (Rohit Shetty) पुन्हा एकदा गँगस्टर आणि खंडणीखोर टोळीच्या निशाण्यावर आला आहे. शनिवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने ऑडिओ कॉलद्वारे रोहित शेट्टीच्या कार्यालयाशी संपर्क साधून तब्बल २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागितलेली प्रचंड रक्कम वेळेत न दिल्यास रोहित शेट्टीला थेट जीवे मारले जाईल, अशी उघड धमकी या कॉलमध्ये देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच रोहित शेट्टीच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर ही नवी धमकी आल्यामुळे मुंबई पोलीस यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी रोहित शेट्टीच्या कर्मचाऱ्याला (स्टाफ) मोबाईलवर सुमारे ९० सेकंदांचा एक ऑडिओ कॉल आला. या कॉलमध्ये बोलणाऱ्या व्यक्तीचा बाज आणि धमकी देण्याची पद्धत पाहता, पोलिसांना यामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सक्रिय आणि फरार हस्तक शुभम लोणकर (Shubham Lonkar) असण्याचा दाट संशय आहे. शुभम लोणकर हा २०२४ मधील हायप्रोफाईल बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असून, फेब्रुवारी २०२६ मध्ये रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातही तो मुंबई पोलिसांना हवा असलेला वॉन्टेड आरोपी आहे.

मुंबई क्राईम ब्रँचच्या (Mumbai Crime Branch) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टीच्या कर्मचाऱ्यांनी कसलाही वेळ न दवडता या धमकीच्या फोनची रेकॉर्डिंग आणि ऑडिओ क्लिप तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन केली. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा आवाज शुभम लोणकरचाच असल्याचे वाटत असले, तरी तांत्रिक पुराव्यासाठी ही ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे (FSL) तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. तसेच खंडणीखोर कॉल करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) तैनात करण्यात आले असून सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास केला जात आहे.

यापूर्वी ३१ जानेवारीच्या मध्यरात्री जुहू येथील महमूद चौक परिसरात असलेल्या रोहित शेट्टीच्या निवासस्थानाबाहेर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडून पळ काढला होता. त्या दहशत निर्माण करणाऱ्या हल्ल्याची जबाबदारीही बिश्नोई गँगने स्वीकारली होती. त्या प्रकरणात गोळीबार करणाऱ्या दीपक शर्मा नावाच्या मुख्य शूटरला पोलिसांनी आग्रा येथून बेड्या ठोकल्या होत्या. दीपकने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बिश्नोई टोळीच्या संपर्कात आल्याची कबुली दिली होती. आता या नव्या धमकीच्या सत्रामुळे रोहित शेट्टीच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली असून, पोलीस या आंतरराज्य टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी वेगाने पावले टाकत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ