Chhatrapati Sambhajinagar : शिक्षक सेनेचा संघटन विस्ताराचा निर्धार; विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी लढ्याचे संकेत

spot_img

छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षक सेनेची जिल्हास्तरीय बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राज्य उपाध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटनेच्या विस्तारासह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटना अधिक मजबूत आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने येत्या काळात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषतः राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील हजारो शिक्षकांना शिक्षक सेनेशी जोडण्याचा संकल्प यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या नितीन देशमुख यांनी शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनात्मक एकजूट आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. संघटना जितकी सक्षम होईल, तितक्या प्रभावीपणे शिक्षकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवता येतील, असे सांगत त्यांनी अन्यायग्रस्त शिक्षकांपर्यंत शिक्षक सेना पोहोचली पाहिजे, असे मत व्यक्त केले. राज्य उपाध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघटन बळकटीसाठी अधिक सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचे संघटनात्मक कार्य राज्यभर आदर्श ठरावे, यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सकारात्मक टीका आणि आत्मपरीक्षण स्वीकारून संघटनेच्या कामात अधिक जबाबदारीने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच राज्य आणि जिल्हास्तरावरील नेतृत्वाने आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्यास संघटनेची ताकद आणि प्रतिष्ठा आणखी वाढेल, असे डॉ. तायडे पाटील यांनी स्पष्ट केले.

बैठकीत शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यात आली. अंशतः अनुदानित शाळांच्या अनुदान टप्प्यात वाढ करणे, सर्व त्रुटी पूर्ण केलेल्या शाळांना शासन निर्णयानुसार अनुदान मंजूर करणे, अपात्र शाळांच्या संचमान्यतेतील पदांना मान्यता देणे, पुणे स्तरावर प्रलंबित असलेल्या अघोषित शाळा व वर्ग तुकड्यांना अनुदानित घोषित करणे, तसेच अंशकालीन कर्मचाऱ्यांना नियमित आणि वेळेवर वेतन देऊन त्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

शिक्षकांवरील अन्याय आणि प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षक सेना येत्या बुधवारी शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. संदीप काळे यांनी दिली. या भेटीदरम्यान विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असून, शिक्षकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास संघटना आक्रमक भूमिका घेण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

या बैठकीला राज्य उपाध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रा. संदीप काळे, सतीश घोडके, रामेश्वर जाधव, शिवाजी मोहिते, उत्कर्ष आहेर, सचिन शेवणकर, नारायण औटे, भाऊसाहेब मगरे, सुनील चितळे, बनसोडे यांच्यासह शिक्षक सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत शिक्षकांच्या हक्कांसाठी संघटित लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ