मुंबईतील एका ब्रँड लॉन्चदरम्यान घडला धक्कादायक प्रकार; पापाराझी संस्कृती आणि चुकीच्या वागणुकीवर पुन्हा एकदा उठले वादाचे वादळ.
बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुंबईत पार पडलेल्या एका कपड्यांच्या ब्रँड लॉन्चच्या कार्यक्रमादरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला. या व्यावसायिक कार्यक्रमात झरीन नेहमीप्रमाणे डेनिम जॅकेट आणि जीन्स अशा स्टायलिश लूकमध्ये पापाराझींना पोझ देत होती. परंतु, याच दरम्यान उपस्थित असलेल्या एका पुरुषाने तिला चक्क ‘सर्वांसमोर कपडे बदलून दाखवण्यास’ सांगितले.
हे शब्द कानावर पडताच झरीन खानचा संयम सुटला आणि ती जाहीरपणे प्रचंड भडकली. तिने त्या व्यक्तीला जागेवरच खडे बोल सुनावले. अत्यंत संतापलेल्या सुरात ती म्हणाली, “स्वतःच्या भाषेवर लक्ष ठेवा आणि मर्यादेत राहा! माझ्यासमोर असं काही बोललात तर मी ते अजिबात खपवून घेणार नाही. तुम्ही काहीही बोलणार आणि मी ते सहन करणार, अशी मी नाही.” झरीनच्या चेहऱ्यावरचा राग आणि तिने दिलेली तंबी कॅमेऱ्यात कैद झाली असून, तिने दाखवलेल्या या धाडसाचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
झरीन खानच्या या प्रकरणाने मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी आणि त्यांच्या मागे फिरणाऱ्या कॅमेरामन/पापाराझी यांच्यातील वादाला पुन्हा तोंड दिले आहे. पापाराझींच्या वागणुकीवर संताप व्यक्त करणारी झरीन ही पहिलीच अभिनेत्री नाही.
काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री नेहा धुपियाने देखील एका पुरस्कार सोहळ्यात पापाराझींवर जोरदार निशाणा साधला होता. “काहीही मर्यादा न ठेवता अभिनेत्रींचे पाठीमागून नको तसे फोटो आणि व्हिडिओ काढणे व ते व्हायरल करणे हे अत्यंत चुकीचे आहे,” असे नेहा म्हणाली होती. आम्ही आदर देतो तर आम्हालाही आदर मिळाला पाहिजे, असे तिने ठणकावून सांगितले होते.
केवळ नेहा किंवा झरीनच नाही, तर सुपरस्टार सलमान खाननेही काही दिवसांपूर्वी मर्यादा ओलांडणाऱ्या पापाराझींवर आपला संताप व्यक्त केला होता. अभिनेत्री मलायका अरोरा हिने देखील एका कॅमेरामनला थेट खडे बोल सुनावले होते. तर, ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या पहिल्यापासूनच या कॅमेरा संस्कृतीच्या विरोधात राहिल्या आहेत.
कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याची आणि आत्मसन्मानाची चाड न राखणाऱ्या अशा वृत्तीला आता कलासृष्टीतून थेट उत्तर मिळायला सुरुवात झाली आहे, हेच या घटनांवरून स्पष्ट होते.




