Maharashtra Beggar’s Assam Home Raided : भिकारी की ५४ कोटींचा मालक? दिव्यांग बनून फिरणाऱ्या सांगलीच्या तरुणाच्या घरात सापडला सोन्याचा डोंगर!

spot_img

आसाम पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा; म्यानमार मार्गे चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सोने तस्करी रॅकेटचा गुवाहाटीमध्ये थरारक पर्दाफाश

शहरात दिव्यांग भिकारी बनून लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणारा एक सामान्य वाटणारा माणूस प्रत्यक्षात कोट्यवधींचा आंतरराष्ट्रीय तस्कर असल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. आसाम पोलिसांनी गुवाहाटी येथील एका घरावर मारलेल्या छाप्यात तब्बल ५४ कोटी रुपयांचे सोने जप्त केले असून, या कारवाईने पोलिसांचेही डोळे पांढरे झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या महाठगाचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन असून तो सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे.

गुवाहाटी पोलीस कमिशनरच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) आणि लतासिल पोलिसांनी खारघुली परिसरातील एका घरावर संयुक्त छापा टाकला. या छाप्यादरम्यान घरातून तब्बल ३७.०६४ किलो शुद्ध सोन्याच्या विटांचे तुकडे जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या २४ कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत ५४ कोटी रुपये इतकी आहे. ईशान्य भारताच्या (North-East) इतिहासामध्ये एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने जप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अक्षय परशुराम बनसोडे (वय ३२, रा. सांगली, महाराष्ट्र) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने गुवाहाटीच्या गांधी बस्ती भागात एक घर भाड्याने घेतले होते. पोलिसांच्या कसून चौकशीत अक्षयने गुन्ह्याची जी पद्धत (Modus Operandi) सांगितली ती ऐकून पोलीसही चक्रावले. गुवाहाटी शहरातील लोकांना किंवा सुरक्षा यंत्रणांना आपला संशय येऊ नये म्हणून अक्षय हा रस्त्यांवर दिव्यांग (अपंग) भिकारी बनून फिरायचा. भिकेचा आडोसा घेऊन तो म्यानमार सीमेवरून येणाऱ्या सोन्याची छुप्या पद्धतीने तस्करी करायचा.

२९ जून रोजी करण्यात आलेल्या या ऐतिहासिक कारवाईत सोन्याव्यतिरिक्त १३ ग्रॅम चांदी, ४ महागडे मोबाईल फोन, काही रोख रक्कम आणि ज्यामध्ये सोने लपवून आणले जायचे त्या विशेष बॅगा पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. पोलिसांनी जप्त केलेले मोबाईल फोन तपासासाठी पाठवले असून त्यातून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागत आहेत.

आसाम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईमुळे केवळ स्थानिक नव्हे तर आंतरराष्ट्रीय सोने तस्करीच्या एका मोठ्या जाळ्याचा (International Smuggling Network) पर्दाफाश झाला आहे. या रॅकेटचे धागेदोरे मिडल ईस्ट (Middle East), म्यानमार आणि भारतातील अनेक मोठ्या शहरांशी जोडलेले आहेत. या काळ्या साम्राज्यात महाराष्ट्रातील किंवा इतर राज्यातील आणखी कोणकोणते बडे मासे सामील आहेत, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ