देशभरात E20 इंधनाच्या वापराबाबत चर्चा सुरू असतानाच छत्तीसगडमधील रायपूर ग्राहक न्यायालयाने एका महत्त्वाच्या प्रकरणात वाहनमालकाच्या बाजूने निर्णय देत मोठा आदेश दिला आहे. केंद्र सरकारकडून इथेनॉल मिश्रित E20 इंधनाला प्रोत्साहन दिले जात असताना, या इंधनामुळे आपल्या कारमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याचा दावा करत एका वाहनमालकाने ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, 2024 मध्ये नवीन कार खरेदी केल्यानंतर सुरुवातीला कोणतीही अडचण नव्हती. मात्र, E20 इंधनाचा वापर सुरू केल्यानंतर इंजिनमध्ये मिसफायरिंग, मायलेजमध्ये घट आणि वारंवार तांत्रिक बिघाड होऊ लागले. अनेक वेळा अधिकृत सेवा केंद्रात दुरुस्ती करूनही समस्या कायम राहिल्याने त्याला मोठा आर्थिक फटका बसल्याचा आरोप करण्यात आला.
दुसरीकडे, वाहन उत्पादक आणि विक्रेत्याने न्यायालयात आपली बाजू मांडताना संबंधित मॉडेल E20 इंधनासाठी पूर्णपणे सुसंगत असल्याचा दावा केला. वाहनातील दोष हा चुकीच्या वापरामुळे किंवा देखभालीतील त्रुटींमुळे निर्माण झाल्याचे कंपनीने सांगितले. मात्र, उपलब्ध पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर ग्राहक न्यायालयाने वाहनमालकाच्या बाजूने निकाल दिला.
न्यायालयाने कंपनीला 45 दिवसांच्या आत तक्रारदाराला त्याच मॉडेलची E20 इंधनावर पूर्णपणे चालणारी नवी कार उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. तसे करणे शक्य नसल्यास वाहनाची संपूर्ण किंमत, म्हणजेच 20 लाख 50 हजार रुपये परत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. E20 इंधनाशी संबंधित तक्रारीच्या प्रकरणात ग्राहक न्यायालयाने दिलेला हा महत्त्वाचा निर्णय मानला जात असून, भविष्यात अशा प्रकारच्या वादांमध्ये या निकालाचा संदर्भ घेतला जाऊ शकतो.




