परिवहन मंत्री बायराथी सुरेश यांनी सर्वसामान्य प्रवासी बनून केली बस आणि रिक्षाची पाहणी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रवाशांनी मांडल्या व्यथा.
कर्नाटकचे परिवहन मंत्री बायराथी सुरेश यांनी सर्वसामान्य प्रवाशांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी शनिवारी रात्री एक आगळावेगळा प्रयोग केला, मात्र या प्रयोगादरम्यान त्यांना अतिशय धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रवाशांच्या समस्या प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी मंत्री सुरेश यांनी तोंडाला मास्क लावला आणि ते कोणालाही न ओळखता सरकारी बसमध्ये चढले. मात्र, सुट्ट्या पैशांच्या किरकोळ वादावरून बस कंडक्टरने थेट मंत्र्यालाच चालत्या बसमधून खाली उतरवल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर काही वेळातच संबंधित बस चालक आणि कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री बायराथी सुरेश यांनी शनिवारी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत जयमहल, आरटी नगर, हेब्बल आणि मान्यता टेक पार्क यांसह अनेक मार्गांवरून फिरून बस सेवेची पाहणी केली. यादरम्यान ते हेब्बल ते नागशेट्टीहल्ली या मार्गावरील बीएमटीसी (BMTC) बसमध्ये चढले. त्यांनी कंडक्टरकडे दोन तिकिटे मागितली आणि १०० रुपयांची नोट दिली. मात्र, कंडक्टरने सुट्ट्या पैशांचा हट्ट धरला. मंत्र्यांनी सुट्टे पैसे नसल्याचे सांगताच, कंडक्टरने उद्धटपणे त्यांना बसमधून उतरण्यास सांगितले. तोंडाला मास्क असल्याने कंडक्टर त्यांना ओळखू शकला नाही. मंत्री सुरेश यांनीही तिथे कोणताही वाद न घालता शांतपणे बसमधून उतरणे पसंत केले. मात्र, हा प्रकार समोर येताच विभागाकडून तात्काळ कारवाई करत त्या चालक आणि कंडक्टरला सेवेतून निलंबित करण्यात आले.
बसचा कटू अनुभव घेतल्यानंतर मंत्री सुरेश यांनी नागशेट्टीहळ्ळी येथून ऑटो रिक्षाने प्रवास केला. तिथेही त्यांना रिक्षाचालकांच्या मनमानीचा सामना करावा लागला. प्रवासादरम्यान रिक्षाचे मीटर ३० रुपये दाखवत होते, मात्र चालकाने भाडे म्हणून थेट ३६ रुपयांची मागणी केली. मंत्र्यांनी जेव्हा ‘मीटर कधी दुरुस्त करणार?’ असा सवाल केला, तेव्हा चालकाने लवकरच दुरुस्त करू असे उत्तर दिले. शेवटी मंत्र्यांनी चालकाला ४० रुपये दिले आणि ते रिक्षातून उतरले. मंत्री सुरेश यांच्या या औचक पाहणीचा आणि प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वसामान्य नागरिकही बस आणि रिक्षा प्रवासादरम्यान येणारे आपले वैयक्तिक वाईट अनुभव शेअर करत असून, प्रशासनाने अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर आणि चालकांवर कायमस्वरूपी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करत आहेत.




