सोशल मीडियावरील व्हीआयपी दाव्यांवर पश्चिम रेल्वेचे मोठे स्पष्टीकरण; सामान्य माणूसही बुक करू शकतो पूर्ण डबा, जाणून घ्या सुविधा आणि भाडं.
काही दिवसांपूर्वी धावत्या ट्रेनमधील एका जोडप्याच्या ‘हनिमून’ व्हिडिओवरून मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद शमतो न शमतो, तोच आता भारतीय रेल्वेच्या ‘सलून कोच’मध्ये चक्क पूजा आणि रुद्राभिषेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि वाद वाढल्यानंतर पश्चिम रेल्वेला यावर अधिकृत स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.
सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की, हा डबा एखाद्या सरकारी कार्यालय, विभाग किंवा मोठ्या व्हीआयपी अधिकाऱ्याला वाटप करण्यात आला होता आणि तिथे हे धार्मिक विधी पार पडले. यावर प्रतिक्रिया देताना पश्चिम रेल्वेने सर्व दावे फेटाळून लावले आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार आयआरसीटीसी (IRCTC) कडे ८ जुलै २०२६ रोजी एका खाजगी संस्थेने या सलून कारचे व्यावसायिक बुकिंग केले होते. या एकमार्गी प्रवासासाठी संबंधित पक्षाने ₹३,०८,५८० (३ लाख ८ हजार ५८० रुपये) एवढी मोठी आगाऊ रक्कम भरली होती. ही सलून कार १० जुलै २०२६ रोजी नवी दिल्ली ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या ‘पश्चिम एक्सप्रेस’ (ट्रेन क्र. १२९२६) ला जोडण्यात आली होती. याच प्रवासादरम्यान एका पुजाऱ्याने डब्यात रुद्राभिषेक केला.
“हा डबा कोणत्याही सरकारी प्राधिकरणाचा नव्हता, तर ते एक खाजगी कमर्शियल बुकिंग होते. त्यामुळे सोशल मीडियावरील व्हीआयपी वाटपाचे दावे पूर्णपणे चुकीचे आहेत. या विधींमुळे प्रवाशांच्या सुरक्षेला किंवा रेल्वेच्या वेळापत्रकाला कोणताही अडथळा आलेला नाही.” माध्यमांच्या अहवालानुसार, जर तुम्ही FTR (Full Tariff Rate – फुल टॅरिफ रेट) अंतर्गत वैयक्तिक वापरासाठी संपूर्ण सलून कोच बुक केला असेल, तर तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार तिथे धार्मिक विधी करू शकता. मात्र, यासाठी काही कडक अटी आहेत:
विधींमुळे सहप्रवाशांना त्रास किंवा गैरसोय होता कामा नये. रेल्वे प्रवासादरम्यान कोणत्याही ज्वलनशील पदार्थांचा वापर किंवा आगीचा धोका निर्माण होईल असे कृत्य करण्यास सक्त मनाई आहे. संभाव्य नुकसान किंवा नियमांचे उल्लंघन झाल्यास दंड वसूल करण्यासाठी बुकिंगच्या वेळीच रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट घेतले जाते.
आयआरसीटीसी टुरिझमच्या अंतर्गत मिळणारा ‘सलून कोच’ म्हणजे धावत्या ट्रेनमधील एक चालते-फिरते आलिशान घरच असते. यामध्ये खालील व्हीआयपी सुविधा मिळतात यात एक प्रशस्त वातानुकूलित (AC) लिव्हिंग-कम-डायनिंग रूम, सोफे, मल्टी-चॅनल टीव्ही आणि जेवणासाठी टेबल-खुर्च्या असतात. यामध्ये बाथरूम जोडलेले दोन मुख्य बेडरूम असतात आणि अतिरिक्त प्रवाशांसाठी ४ ते ६ एक्स्ट्रा बर्थ/बेड असतात. प्रवासात ताजे अन्न शिजवण्यासाठी सर्व भांडी, हॉट वॉटर सिंक, फ्रीज आणि RO फिल्टरने सुसज्ज असे किचन असते. अतिरिक्त शुल्क भरल्यास IRCTC कडून शेफ (स्वयंपाकी) आणि साहित्याची सोयही केली जाते. प्रवाशांच्या सेवेसाठी एक एसी अटेंडंट आणि एक जनरल अटेंडंट २४ तास उपलब्ध असतो.
हा सलून प्रवास कुटुंब किंवा प्रियजनांसोबत खाजगीपणा (Privacy) शोधणाऱ्यांसाठी, नवविवाहित जोडप्यांसाठी (हनिमूनसाठी) किंवा प्रवासादरम्यान अत्यंत गोपनीय बिझनेस मीटिंग्स घेण्यासाठी सर्वोत्तम आणि लक्झरियस पर्याय मानला जातो.




