Ashok Kharat : ‘भगवान शिवाचा अवतार’ सांगणाऱ्या भोंदू बाबाचा काळाबाजार उघड; अशोक खरातविरोधात ED चे ३००० पानांचे आरोपपत्र!

spot_img

चिंचेच्या बिया अन् मधातून ४२ कोटींची माया; १४२ बेनामी खाती आणि पत्नीच्या नावावरील मालमत्तांचा पर्दाफाश

आध्यात्मिक उपचारांच्या बहाण्याने भक्तांची फसवणूक करणाऱ्या आणि महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नाशिकच्या वादग्रस्त ‘कॅप्टन भोंदू बाबा’ उर्फ अशोक खरातच्या अडचणीत आता कमालीची वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) खरातविरोधात विशेष पीएमएलए (PMLA) न्यायालयात तब्बल ३ हजार पानांचे अवाढव्य आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात खरातच्या काळ्या साम्राज्याचा आणि मनी लॉन्डरिंगचा संपूर्ण लेखाजोखा मांडण्यात आला असून, त्याने भक्तांची विविध मार्गांनी लूट करून तब्बल ४२.८८ कोटी रुपयांची अवैध संपत्ती जमवल्याचे ईडीने पुराव्यांसह स्पष्ट केले आहे.

ईडीच्या आरोपपत्रातून अशोक खरातच्या भोंदूगिरीचे अत्यंत थक्क करणारे प्रकार समोर आले आहेत. स्वतःला ‘भगवान शिवाचा अवतार’ सांगणारा खरात धार्मिक कार्यक्रमांमध्ये रिमोट कंट्रोलवर चालणारे कृत्रिम साप आणि वाघाच्या कातड्याचा वापर करून चमत्काराचा खोटा आभास निर्माण करायचा. तो साध्या चिंचेच्या बियांमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करून प्रत्येकी २ लाख रुपयांना, तर मधाच्या बाटल्या ९ लाख रुपयांना भक्तांना विकायचा. श्रीमंत व्यावसायिकांना घरच्यांच्या मृत्यूची किंवा व्यवसाय कोलमडण्याची भीती दाखवून तो ‘अवतार पूजा’ आणि देणग्यांच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळायचा.

या लुटीच्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी खरातने तब्बल १४२ बेनामी बँक खाती उघडली होती, ज्यांचा ताबा स्वतःकडे ठेवण्यासाठी त्याने सर्व खात्यांना स्वतःचे मोबाईल नंबर लिंक केले होते. यात एका सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नामकरण आवारे यांनी ३४ बेनामी खाती उघडण्यास मदत केली, तर बँक व्यवस्थापकांनी केवायसी (KYC) नियमांचे उल्लंघन केले. खरातचा सहकारी अरविंद बावाके याने १८ ते २० कोटींच्या रोख व्यवहारांमध्ये मुख्य भूमिका बजावली. या कारवाईदरम्यान ईडीने १९.२० कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली असून, १७.७० कोटींची रोकड, विदेशी चलन, सोने-चांदीचे दागिने आणि एक आलिशान मर्सिडीज कार जप्त केली आहे.

अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यावरही या बेकायदेशीर पैशांमधून खरेदी केलेल्या मालमत्ता स्वतःच्या नावावर नोंदवून मनी लॉन्डरिंगला थेट मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सरकारवाडा, शिर्डी, सिन्नर आणि राहाता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक व खंडणीच्या गुन्ह्यांच्या आधारे ईडी हा तपास करत आहे. खरात केवळ आर्थिक फसवणूकच करायचा नाही, तर मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्याने असंख्य महिलांचे लैंगिक शोषण केले होते. त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती आणि पोलिसांनी त्याला अटक केली होती. आता ईडीच्या या ३ हजार पानांच्या आरोपपत्रामुळे या भोंदू बाबाचा जेलमधील मुक्काम चांगलाच वाढणार असल्याचे चिन्हे आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ