नीट-यूजी परीक्षेभोवतीचा वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. पेपरफुटीच्या आरोपांनंतर घेण्यात आलेल्या पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता गुणांच्या मूल्यमापनावरच गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बीडमधील विद्यार्थी सोहम नितीन गवते याने उत्तरपत्रिकेच्या आधारे आपल्याला 522 गुण मिळणे अपेक्षित असल्याचा दावा केला आहे. मात्र, एनटीएकडून प्राप्त झालेल्या अधिकृत स्कोअरकार्डवर त्याला केवळ 95 गुण देण्यात आल्याचे त्याचे म्हणणे आहे. या कथित तफावतीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून, एनटीएच्या मूल्यमापन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोहमच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे. याचबरोबर वडवणी येथील ज्ञानेश्वरी अनिल कुमार पवार हिच्याबाबतही असाच प्रकार समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.
उत्तरपत्रिकेच्या आधारे तिला सुमारे 700 गुण मिळण्याची अपेक्षा होती, मात्र अधिकृत स्कोअरकार्डवर केवळ 87 गुण दाखवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीनंतर आता निकाल आणि मूल्यमापन प्रक्रियेबाबतही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या आरोपांवर एनटीए काय स्पष्टीकरण देते आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




