Mexico Earthquake : मेक्सिको-ग्वाटेमाला सीमेवर ७.३ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; किनारपट्टी भागात त्सुनामीचा हाय-अलर्ट

spot_img

दक्षिण मेक्सिकोच्या पॅसिफिक किनारपट्टीवर ७.३ तीव्रतेच्या एका प्रलयंकारी भूकंपाने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. मेक्सिको आणि ग्वाटेमालाच्या सीमावर्ती भागाला या भूकंपाचा मुख्य फटका बसला असून, याचे धक्के थेट एल साल्वाडोरपर्यंत जाणवले आहेत. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणत्याही मोठ्या जीवित किंवा वित्तहानीचे वृत्त आलेले नाही; मात्र, प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांत त्सुनामीचा गंभीर इशारा दिल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ‘यूएस जिओलॉजिकल सर्व्हे’ने (USGS) दिलेल्या अहवालानुसार, या भूकंपाचे मुख्य केंद्र चियापास किनारपट्टीवरील अक्विलेस सेरदान शहरापासून नैऋत्येला सुमारे ४८ किलोमीटर अंतरावर, समुद्रात १५ किलोमीटर खोलीवर होते. विशेष म्हणजे, या मोठ्या धक्क्यापूर्वी समुद्रात कमी तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला होता, ज्यामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

अमेरिकेच्या त्सुनामी वॉर्निंग सिस्टीमने तात्काळ पावले उचलत भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या सर्व किनारपट्ट्यांवर हाय-अलर्ट जारी केला आहे. यामध्ये मुख्यत्वे दक्षिण मेक्सिको आणि ग्वाटेमालाच्या किनारपट्टीवर सुमारे ३ फूट (१ मीटर) उंचीच्या धोकादायक लाटा धडकण्याची शक्यता आहे, तर कोलंबिया, कोस्टा रिका, इक्वाडोर, एल साल्वाडोर, होंडुरास, निकाराग्वा, पनामा आणि पेरू या देशांच्या पॅसिफिक किनारपट्ट्यांवर १ फुटापर्यंत लाटा उसळू शकतात. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की ग्वाटेमाला सिटी आणि मेक्सिकोच्या तापाचुला शहरात बहुमजली इमारती जोरात हलू लागल्या, ज्यामुळे घाबरलेले नागरिक रस्त्यावर धावून आले. सध्या स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथके किनारपट्टीच्या भागावर बारीक लक्ष ठेवून असून नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ