पावसाळ्याच्या पहिल्या सरी कोसळल्या की हवेत छान गारवा निर्माण होतो आणि अशातच रस्त्या कडेला मिळणारे गरमागरम वडापाव, भजी, मका, भेळ आणि चटपटीत पाणीपुरीचा सुगंध खवय्यांना आकर्षित करू लागतो. पावसाळा आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ (Street Food) यांचे एक वेगळेच नाते आहे. मात्र, या ऋतूत जिभेचे चोचले पुरवत असताना आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण, पावसाळ्यात हवेतील आर्द्रता आणि पाण्यामुळे जीवाणूंची झपाट्याने वाढ होते, ज्यामुळे अन्न दूषित होण्याचा आणि पोटाचे विकार, संसर्ग (Infections) होण्याचा धोका सर्वाधिक असतो. क्षणिक चवीसाठी आरोग्य धोक्यात येऊ नये, म्हणून स्ट्रीट फूडचा आनंद घेताना काही महत्त्वाच्या गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात रस्त्यावरील पदार्थ खाताना सर्वात पहिली आणि महत्त्वाची अट म्हणजे ‘स्वच्छता’. तुम्ही ज्या स्टॉलवरून खाद्यपदार्थ घेत आहात, तिथली भांडी, विक्रेत्याचे हात, आजूबाजूचा परिसर आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वच्छ आहे का, याची खात्री करून घ्या. शक्यतो उघड्यावरील अन्न खाणे पूर्णपणे टाळावे. या दिवसांत ताजे आणि कडकडीत गरम केलेले पदार्थ खाणे सर्वात सुरक्षित मानले जाते; कारण उष्णतेमुळे अन्नातील घातक जीवाणू नष्ट होतात. त्यामुळे नुकतीच तळलेली भजी, गरम वडापाव किंवा भाजलेला मका यांसारख्या पदार्थांना प्राधान्य द्यावे. याउलट, आधीच कापून ठेवलेली फळे, सलाड आणि पाणीपुरी यांसारख्या कच्च्या व पाण्याचा वापर असलेल्या पदार्थांपासून दूर राहिलेलेच बरे; कारण यामध्ये वापरले जाणारे पाणी आणि स्वच्छतेची कोणतीही शाश्वती नसते.
पावसाळी आजारांपासून दूर राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा:
बाहेर खाताना नेहमी स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवा किंवा पॅकबंद (Mineral Water) पाणीच प्या. तसेच, पावसाळ्यात नळाला दूषित पाणी येण्याची शक्यता जास्त असल्याने घरीसुद्धा पाणी नेहमी गाळून आणि उकळूनच पिणे फायदेशीर ठरते. सतत तळलेले, अति तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते. परिणामी अपचन, ॲसिडिटी, गॅसेस आणि पोटदुखीचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. बाहेरील खाण्यासोबतच शरीराची प्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत ठेवणे आवश्यक आहे. यासाठी रोजच्या आहारात गरमागरम सूप, हळदीचे दूध, घरगुती ताजी फळे आणि पालेभाज्यांचा समावेश आवर्जून करा.
पावसाळ्याच्या आल्हाददायक वातावरणात चमचमीत खाण्याची मजा नक्कीच घ्या, पण योग्य निवड आणि थोडीशी खबरदारी बाळगून आरोग्याची गाडी रुळावरून घसरणार नाही, याचीही काळजी घ्या.




