विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. मात्र या कारवाईनंतर बाळ माने यांनी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवर थेट आरोप करत राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना बाळ माने यांनी आपल्या निर्णयामागील कारणे स्पष्ट केली. निवडणुकीच्या गणिताचा विचार करता अपेक्षित मतसंख्या मिळण्याची शक्यता कमी होती. अशा परिस्थितीत निवडणूक लढविल्यास पक्षाची आणि स्वतःची राजकीय प्रतिमा धोक्यात आली असती. त्यामुळे परिस्थितीचे वास्तव स्वीकारत माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोकणातील राजकारणात घोडेबाजाराला खतपाणी न घालता सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यावरही गंभीर आरोप केले. पक्षातील कार्यकर्त्यांना चुकीची माहिती देणे, दिशाभूल करणे आणि काही राजकीय घडामोडींमध्ये संशयास्पद भूमिका घेणे, असे आरोप त्यांनी राऊत यांच्यावर केले. पक्षातून काढून टाकण्यापूर्वी आपली कोणतीही बाजू ऐकून घेतली गेली नाही, तसेच कोणतीही नोटीस देण्यात आली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आपल्यावर करण्यात आलेले आर्थिक व्यवहारांचे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे सांगत बाळ माने यांनी आरोप करणाऱ्यांना थेट आव्हान दिले. आरोप सिद्ध झाल्यास आपण राजकारणातून कायमचे निवृत्त होण्यास तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या वक्तव्यांमुळे कोकणातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून ठाकरे गटाकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




