जिल्हा प्रतिनिधी | विवेक चौधरी
अनुसूचित जाती (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया” पक्षाने छत्रपती संभाजीनगर येथे तीव्र भूमिका घेतली आहे. राज्य कार्याध्यक्ष मा. श्री. बाबुरावजी कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासन तसेच मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पक्षाची भूमिका आणि भावना पोहोचविण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासन अनुसूचित जाती (SC) आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा विचार करत असून हा विचार भारतीय संविधानाच्या मूळ भावनेच्या विरोधात असल्याचे पक्षाचे स्पष्ट मत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जातीतील सर्व ५९ जातींसाठी १३ टक्के आरक्षणाची तरतूद केली असून, त्या आरक्षणामध्ये अ, ब, क, ड अशा प्रकारचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. असे उपवर्गीकरण करणे म्हणजे संविधानाचा अवमान असल्याची भूमिकाही पक्षाने मांडली.
यावेळी पक्षाने शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. शासनाने गठित केलेली बडर समिती तात्काळ रद्द करून तिचा संपूर्ण अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच अनुसूचित जातीतील विविध घटकांची अचूक लोकसंख्या आणि सामाजिक माहिती उपलब्ध नसताना उपवर्गीकरणाचा निर्णय घेणे योग्य नसल्याने जातनिहाय जनगणना करणे आवश्यक असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
सध्याच्या अपुऱ्या माहितीच्या आधारे उपवर्गीकरणाचा निर्णय घेतल्यास अनुसूचित जातीतील उर्वरित ५८ जातींवर अन्याय होण्याची शक्यता असल्याचे पक्षाने नमूद केले. उपवर्गीकरणाच्या चर्चेमुळे समाजामध्ये दरी निर्माण होऊ नये, सामाजिक सलोखा कायम राहावा आणि शासनाने कोणताही विभाजनकारी निर्णय घेऊ नये, अशी अपेक्षाही निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने शासनाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर अधिक तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
या शिष्टमंडळात मा. श्री. बाबुरावजी कदम (राज्य कार्याध्यक्ष), मिलिंद शेळके (मराठवाडा अध्यक्ष), दौलत खतात (राज्य उपाध्यक्ष), किशोर थोरात, बाळकृष्ण इंगळे (जिल्हाध्यक्ष), विजय मगरे (जिल्हाध्यक्ष), अरविंद अवसारमल (मराठवाडा संघटक), दिलीप पाडुरंग (मराठवाडा उपाध्यक्ष), रोकेश पंडित (युवक जिल्हाध्यक्ष), लक्ष्मण हिरवाळे (मराठवाडा संघटक), अमोल कोतेकर (जिल्हा उपाध्यक्ष) यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




