अँटी रोमियो पथकाची मोठी कारवाई; अश्लील शेरेबाजी आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या दोन महिलांना अटक.
साधारणपणे महिला किंवा तरुणींच्या छेडछाडीच्या घटना समोर येत असतात, मात्र वाराणसीमधून एक अत्यंत वेगळा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका ‘लेडी गँग’ने सार्वजनिक ठिकाणी जाणाऱ्या पुरुषांचे जगणे मुश्किल केले होते. या महिला रस्त्यावर चालणाऱ्या पुरुषांवर अश्लील शेरेबाजी करणे, त्यांच्याकडे पाहून अश्लील हावभाव करणे आणि विरोध करणाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणे असे प्रकार करत होत्या. या नित्यच्या त्रासाला कंटाळून काही नागरिकांनी आणि दुकानदारांनी पोलिसांकडे तक्रार केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वाराणसी पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार अँटी रोमियो पथकाने शहरातील काही प्रमुख ठिकाणी सापळा रचला. यादरम्यान, स्टेशनबाहेर तोंडाला ओढणी बांधून आणि शर्ट-पँट परिधान करून प्रवाशांना त्रास देणाऱ्या दोन महिलांना रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्या इतर साथीदारांचाही शोध घेतला जात आहे. या अजब घटनेमुळे वाराणसी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.




