दहा लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत
ओतूर,प्रतिनिधी:दि.२० जुलै [ रमेश तांबे ]
जुन्नर शहरातील अहिल्याबाई होळकर शाळेच्या मैदानावर रात्रीच्या वेळी पोलिस गस्त घालत असताना संशयास्पद हालचाल दिसून आल्याने चौकशी करता इनोव्हा कारमध्ये तीन किलो गांजा सापडला. पोलीसांच्या कारवाई दरम्यान तीन आरोपी पळून जात असताना एका आरोपीस अटक करण्यात यश आले. या कारवाईत पोलिसांनी इनोव्हा कार, दुचाकी आणि तीन किलो गांजा असा एकूण दहा लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सनी उर्फ मयूर संजय खराडे वय २७, रा.कल्याण पेठ, जुन्नर ता.जुन्नर, जि.पुणे असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
असीम खलील कुरेशी रा.शुक्रवार पेठ, ता.जुन्नर,जि.पुणे, निखिल परदेशी ( पूर्ण नाव माहित नाही ) रा.प्ल्याटिनम हॉटेलच्या बाजूला ता.जुन्नर, जि.पुणे हे दोन आरोपी फरार आहेत. याबाबतची हकिकत अशी की ,रविवारी दि.१९ रोजी पहाटे पावणे दोनच्या सुमारास पोलिस गस्त घालत असताना नगरपालिकेच्या अहिल्याबाई होळकर शाळेच्या मैदानावर संशयास्पद हालचाल दिसून आल्याने,पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड व इतर स्टाफ फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दोन पंचासह रवाना झाले. त्या ठिकाणी अधिक चौकशी करता,तीन तरूण पळून जात असताना आरोपी मयूर संजय खराडे उर्फ सनी यास अटक केली.अन्य आरोपी निखिल परदेशी व असीम खलील कुरेशी हे दोन आरोपी फरार आहेत
पोलिसांनी पकडलेला आरोपी सनी उर्फ मयूर खराडे यांच्याकडेअधिक चौकशी केली असता त्याच्याकडे इनोव्हा गाडीमध्ये गांजासारखा पदार्थ दिसला आरोपी मयूर खराडे यांना एनडीपीडी कायदा कलम ५० प्रमाणे नोटीस देऊन टोयोटा कंपनीची इनोव्हा गाडी नंबर एम एच १२ ईटी ३९११ ची झडती घेतली असता,सदर गाडीमध्ये खाकी रंगाच्या चिकट टेपने गुंडाळलेले पाकीट मिळून आले त्यात गांजा सारखा उग्र वास येत असल्याने ते पाकीट ताब्यात घेतले तसेच बाजूला उभी असलेली एक्टिवा मोटरसायकल गाडी क्रमांक एम एच १४ सी एच ६२६५ च्या हँडलला प्लॅस्टिकच्या पिशवीची पाहणी केली त्यात गांजासारखा उग्र वास येत असल्याने ती ताब्यात घेतली पंचायत समक्ष इलेक्ट्रिक काट्यावर त्याचे वजन केले असता,त्याचे वजन २.०६६ व ०.९६२ असे भरले म्हणून यातील आरोपी यांनी संगणमत करून,अमली पदार्थ गांजा अवैद्यरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने चार चाकी मध्ये व ॲक्टीव्हा मोटर सायकल मध्ये जवळ बाळगल्याच्या स्थितीत मिळून आल्याने सदर आरोपींविरूद्ध सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिली आहे.अधिक तपास पोलिस निरिक्षक दत्तात्रय गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढिल तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप मोरे करत आहेत.




