Solapur Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि १ वर्षाच्या चिमुरडीची निघृण हत्या; नराधम पतीला जन्मठेपेची शिक्षा

spot_img

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातील धक्कादायक घटना; मांजरीच्या तीन पिल्लांचाही जीव घेणाऱ्या आरोपीला कोर्टाचा दणका

दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने एका पतीने क्रूरतेची सर्व हद्द पार करत स्वतःची पत्नी आणि अवघ्या एक वर्षाच्या चिमुरड्या मुलीची हत्या केली. याप्रकरणी पंढरपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी दोषी पती संजय नागप्पा कोरे याला जन्मठेपेची सक्तमजुरी आणि दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील सिद्धनकेरी येथील रहिवासी असलेला आरोपी संजय कोरे हा पत्नी सुरेखाच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन तिचा छळ करत असे. ३ डिसेंबर २०१७ च्या रात्री कौटुंबिक वादातून संतापाचा भडका उडाल्याने त्याने लोखंडी कांबीने डोक्यात गंभीर वार करून पत्नी सुरेखाची निर्घृण हत्या केली. एवढ्यावरच न थांबता, गाढ झोपेत असलेल्या स्वतःच्या एक वर्षाच्या चिमुकल्या श्रावणीवरही त्याने त्याच लोखंडी कांबीने वार करून तिला जागीच ठार केले. संतापाच्या भरात या नराधमाने घरातील मांजरीच्या तीन निष्पाप पिल्लांनाही लोखंडी कांबीने ठेचून मारले.

या भयानक कृत्यानंतर आरोपीने स्वतः गावात जाऊन ग्रामस्थांकडे गुन्ह्याची कबुली दिली, ज्यानंतर पोलिसांनी त्याला तत्काळ बेड्या ठोकल्या. न्यायालयाने या दुहेरी हत्याकांडासह मुक्या प्राण्यांवर केलेल्या क्रूर अत्याचाराची अतिशय गंभीर दखल घेतली. भारतीय दंड संहितेच्या कलम ४२९ अंतर्गत प्राण्यांच्या हत्येप्रकरणी त्याला २ वर्षे सक्तमजुरी व दंडाची स्वतंत्र शिक्षा सुनावण्यात आली.

तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला, तर सरकारी वकील सारंग वांगीकर यांनी कोर्टात बाजू मांडली. वैद्यकीय अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींसह ११ साक्षीदारांची साक्ष या खटल्यात अत्यंत निर्णायक ठरली. सादर केलेले भक्कम पुरावे आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपी संजय कोरेला जन्मठेप व दंडाची शिक्षा ठोठावली. तर, या प्रकरणातील इतर दोन संशयित नागप्पा कोरे आणि शारदाबाई कोरे यांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ