Mumbai Domestic Tragedy : संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् क्षणात संसार उद्ध्वस्त! जोगेश्वरीत पहिल्या पतीशी बोलते या संशयातून पतीनेच केली पत्नीची हत्या

spot_img

दुसऱ्या विवाहानांतरही पत्नी पहिल्या पतीच्या संपर्कात असल्याचा संशय; ओशिवरा पोलिसांनी आरोपी पतीला आवळल्या बेड्या.

विश्वास हाच कोणत्याही नात्याचा खरा पाया असतो, मात्र याच विश्वासाला संशयाने तडे दिल्यास काय भयंकर परिणाम होऊ शकतात, याचे एक संतापजनक आणि सुन्न करणारे प्रकरण मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम येथून समोर आले आहे. पत्नी आपल्या पहिल्या पतीशी मोबाईलवर बोलते या अंध संशयातून एका विसाे वर्षांच्या तरुणाने आपल्याच पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एस. व्ही. रोडवरील गुलशननगर परिसरातील रोस्वाल्ट इमारतीत ही दुर्देवी घटना घडली असून, शबरुन नेसा रोजामियाँ अन्सारी असे मृत महिलेचे नाव आहे, तर सेराज अन्सारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शबरुन हिचा सेराजसोबत हा दुसरा विवाह होता. मात्र, लग्न झाल्यानंतरही ती तिच्या पहिल्या पतीच्या सतत संपर्कात असते आणि त्याच्याशी फोनवर बोलते, असा संशय सेराजला बळावला होता. याच क्षुल्लक कारणावरून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात खटके उडत होते आणि वारंवार वाद होत होते. सोमवारी रात्री याच मुद्यावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा टोकाचे भांडण झाले, ज्यामध्ये संतापाच्या भरात सेराजने शबरुनचा गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. चौकशीदरम्यान आरोपी सेराजने आपला गुन्हा कबूल केल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली असून, अंधेरी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे जोगेश्वरी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून संशयाच्या आहारी गेल्याने एका निष्पाप महिलेचा जीव गेल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ