Sachin Ahir House Theft : शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या घरातून २.६५ कोटींची चोरी; २४ वर्षे काम करणाऱ्या विश्वासू नोकराला अटक

spot_img

वरळीतील निवासस्थानातून सोन्याची बिस्किटे, हिऱ्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवल्याचा आरोप; ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी

शिवसेना नेते आणि विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांच्या वरळी येथील निवासस्थानातून गेल्या पाच वर्षांत तब्बल २ कोटी ६५ लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या हायप्रोफाइल चोरीच्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. फोर्ट येथील मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला ३० जुलैपर्यंत गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

वरळी सी-फेस येथील ‘गुलरुख’ इमारतीत सचिन अहिर यांचे कुटुंबीय राहतात. याप्रकरणी गुन्हे शाखेने प्रवीण रमेश सोलंकी या नोकराला अटक केली असून, तो गेल्या २४ वर्षांपासून अहिर यांच्या घरी साफसफाई व इतर कामांची जबाबदारी सांभाळत होता. तो जुना आणि अत्यंत विश्वासू नोकर असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन त्याने इतर साथीदारांच्या मदतीने टप्प्याटप्प्याने ही चोरी केल्याचा संशय आहे. गेल्या १६ जुलै २०२६ रोजी हा प्रकार उघडकीस आला, जेव्हा घरातील इतर कामगारांपैकी काही जणांकडे अचानक संपत्ती वाढल्याचे आणि त्यांनी झारखंडमध्ये नवीन घरे व वाहने खरेदी केल्याची कुणकुण लागली. त्यानंतर केलेल्या चौकशीत या चोरीचा पर्दाफाश झाला.

गुन्हे शाखेच्या तपासानुसार, आरोपीने सोन्याची बिस्किटे, हिरेजडीत महागड्या बांगड्या, चांदीची भांडी आणि रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली असून चोरीचा माल विकून पैसे आपापसात वाटल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, ऑक्टोबर २०२५ मध्ये घरातील शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा आणि खराब झालेल्या सीसीटीव्ही फुटेजचा गैरफायदा घेत चोरट्यांनी हात साफ केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी आपल्या अशिलावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून, गुन्हे शाखेचे डीसीपी राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ