Pune News : करंजाळेजवळ राष्ट्रीय महामार्ग खचला; माळशेज घाट मार्गे होणारी वाहतूक बंद

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:दि.२७ जुलै [ रमेश तांबे ]

अहिल्यानगर -कल्याण महामार्गावर करंजाळे गावचे हद्दीत रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्यामुळे, हा महामार्ग रस्ता दुरूस्तीच्या  कामासाठी बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली असून,याबाबतचे आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग आणि पोलीस प्रशासनाला दिले आहे.

गेल्या काही दिवसापासून माळशेज घाट परिसरात सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे,जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ करंजाळे गावाजवळ मोठ्या प्रमाणात खचला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून माळशेज घाटमार्गे मुंबईकडे जाणारी व येणारी सर्व प्रकारची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद केली आहे.

रस्ता खचल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. संबंधित मार्गाची दुरूस्ती पूर्ण होऊन तो सुरक्षितपणे वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत हा आदेश कायम राहणार आहे. दरम्यान, अहिल्यानगर व पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आळेफाटा-नारायणगाव-खेड-चाकण-तळेगाव मुंबई हा पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून, आवश्यकतेनुसार इतर पर्यायी मार्गांचाही वापर करण्याचे सांगण्यात आले आहे.

माळशेज घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागातील परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी ही माहिती देत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ