मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेमध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पश्चिम रेल्वेवरील वादातून झालेला खून आणि लोकलमध्ये घडणाऱ्या मारहाणीच्या घटनांनंतर आता एका नव्या आरोपामुळे मुंबईची लोकल पुन्हा चर्चेत आली आहे. सचिन कुमार मौर्य या प्रवाशाने रेल्वेच्या तिकीट तपासनीसावर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
मौर्य यांच्या तक्रारीनुसार, २५ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास मस्जिद बंदर स्थानकाजवळ हा प्रकार घडला. ते लोकलमधून उतरत असताना एका टीसीकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी पाहिले. संबंधित प्रवाशाकडे दंड भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याचे समजल्यानंतर, टीसीने त्याला धावत्या लोकलमधून लाथ मारून बाहेर ढकलल्याचा दावा मौर्य यांनी केला आहे. या घटनेत तो प्रवासी रेल्वे रुळांवर पडल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या गंभीर आरोपानंतर रेल्वे प्रशासनाने तक्रारीची दखल घेतली असून, संबंधित प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रवाशाने केलेले आरोप कितपत खरे आहेत, याचा तपास सुरू असून, या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




